मध्यप्रदेशात सत्ता मिळाल्यास ज्योतिरादित्य मुख्यमंत्री

भोपाळ, -मध्यप्रदेशात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवताना भाजपला सत्तेवरून पायउतार केले.

कर्नाटकमधील निकालामुळे सध्या काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळेच विविध राज्यांमधून भाजपची सत्ता जाण्याचे संकेत मिळत असल्याच्या प्रतिक्रीया काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत. अशातच भाजपशासित मध्यप्रदेशात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत विजय मिळेल, अशी आशा काँग्रेसजनांना वाटत आहे. त्यातूनच या निवडणुकीसाठी काही महिन्यांचा अवधी असला तरी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कांतिलाल भुरिया, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजय सिंह यांचे समर्थक आपापल्या नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करत आहेत. मात्र, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. मध्यप्रदेशात
काँग्रेसला सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रिपदासाठी ज्योतिरादित्य यांचे नाव आघाडीवर राहील, असे भाकित दिग्विजय यांनी नुकतेच केले. दिग्विजय हे
काँग्रेस हायकमांडचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे

Leave a Comment