बन्सल व अश्वनी कुमार यांचे राजीनामे

नवी दिल्ली – रेल्वेतील लाचखोरी तसेच कोळसा खाणवाटप प्रकरणीच्या सीबीआय चौकशी अहवालात फेरफार केल्याच्या आरोपावरून यूपीए सरकारचा काळा चेहरा ठरलेले रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल व कायदामंत्री अश्वनी कुमार यांनी अखेर मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बचावाचा मार्गच न उरल्याने या दोघांनीही रात्री पंतप्रधानांकडे राजीनामा दिला.

रेल्वेतील लाचखोरी तसेच कोळसा खाणवाटप प्रकरणीच्या सीबीआय चौकशी अहवालात फेरफार केल्याचा गंभीर ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवल्याने अनुक्रमे बन्सल व अश्वनी कुमार यांनी यूपीए सरकारला अडचणीत आणले होते. तरीही गेले काही दिवस त्यांच्यावरील कारवाई टाळली जात होती. या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला होता. मात्र सायंकाळी सोनियांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या बचावाची सर्व दारे बंद झाली. या दोघांना कोणत्याही परिस्थितीत अभय देण्यास सोनियांनी विरोध केल्याचे समजते. सोनियांनी लगेचच दोघांचीही हकालपट्टी करण्याचा ‘ आदेश ‘ दिला व त्यानंतर बन्सल व कुमार यांनी पंतप्रधानांची भेट घेत, राजीनामा सुपूर्द केला.

पवनकुमार यांचा राजीनामा एका अर्थी काँग्रेसमधील नाराजी दूर सारण्यासाठीही कामी येण्याची चिन्हे आहेत. कर्नाटक विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शुक्रवारीच सिद्धरामय्या यांची नियुक्ती झाल्याने मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असेलेले मल्लिकार्जुन खर्गे नाराज होते. खर्गे यांची ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना रेल्वेमंत्रिपद देण्याचा काँग्रेसश्रेष्ठी विचार करीत आहेत.