मुंबई – आगामी काळात दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकपद कौटुंबिक कारणास्तव सोडण्याचा निर्णय प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी घेतला असल्याचे समजते. येत्या ऑगस्ट महिन्यात गॅरी कर्स्टन यांचा दक्षिण आफ्रिका संघाच्या प्रशिक्षकपदाचा करार संपुष्टात येत आहे. त्यानंतर नवीन करार न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कर्स्टन सोडणार आफ्रिकेचे प्रशिक्षकपद
क्रिकेट प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतानंतर दक्षिण आफ्रिकेला सुद्धा कसोटी क्रिकेटच्या अव्वल स्थानावर नेण्याचे काम केले आहे. गेल्या काही दिवसापासून कर्स्टन यांच्यावरील कौटुंबिक जबाबदारीत वाढ झाली आहे. त्यामुळे ऑगस्टनंतर कौटुंबिक कारणास्तव प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाला आगामी काळात कराराचे नूतनीकरण करू नये, असा संदेश कर्स्टन त्यांनी दिला आहे. कुटुंबीयांसाठी अधिक वेळ देता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डानेही कर्स्टन यांनी प्रशिक्षक पदासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत. त्यांनी कुटुंबीयांसाठी वेळ मिळावा यासाठी घेतलेल्या निर्णयाचा क्रिकेट बोर्डाने आदर आणि सन्मान केला आहे.