मधु चव्हाण यांचा राजीनामा

मुंबई – बलात्काराच्या आरोपामुळे व्यतीत झालेले भाजपचे नेते आणि माजी आमदार मधु चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सोपवला आहे . एका ५० वर्षीय महिलेने चव्हाण यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे . या प्रकरणात मधु चव्हाण यांच्याविरोधात बुधवारी काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अध्याप त्यांना या प्रकरणी अटक झालेली नाही.

भाजपचे नेते तथा माजी आमदार मधु चव्हाण यांनी गेल्या २० वर्षापासून लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार करत असल्याचा आरोप एका ५० वर्षीय महिलेने केला आहे. चव्हाण यांनी घर नावावर करून देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र ते आश्वासन देखील त्यानी पूर्ण केले नसल्याचा आरोप संबंधित महिलेने केले आहेत. या काळात मुंबई सेंट्रल येथील घरासह अनेक ठिकाणी बलात्कार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे . या प्रकरणी पीडित महिलेने बुधवारी काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून अद्याप चव्हाण यांना अटक करण्यात आलेली नाही .

पक्षाच्या एका बैठकी दरम्यान १९९३ मध्ये मधु चव्हाण आणि संबंधित महिलेची ओळख झाली होती. त्यानंतर २००५ साली दोघांनी काही मित्रांच्या उपस्थितीत लग्नही केले होते , अशी तक्रार महिलेने दाखल केली असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण साळुंखे यांनी सांगितले. दरम्यान, माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे असून माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचे मधु चव्हाण यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

Leave a Comment