इम्रान खान मुकणार मतदानाला

लाहोर, दि. 9 – पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी (दि.11 मे) मतदान होणार आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि एका राजकीय पक्षाचे प्रमुख इम्रान खान मतदानाला मुकणार आहेत. एका सभेवेळी फॉर्कलिफ्टवरून कोसळल्यामुळे जखमी झाल्यानेत्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.

इम्रान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरिक ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी स्वत: इम्रान यांनीही झंझावाती प्रचारदौरा केला. मंगळवारी प्रचारसभेवेळी फॉर्कलिफ्टवरून कोसळल्यामुळे ते जखमी झाले. त्यामुळे त्यांच्यावर सध्या येथील एका रुग्णालयात उपचार चालू आहेत. आणखी काही काळ त्यांना विश्रांतीची गरज आहे. मतदानासाठी प्रवास करणे त्यांना शक्य होणार नाही, असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. मतदार म्हणून इम्रान यांच्या नावाची नोंद मियाँवाली शहरात करण्यात आली आहे.

Leave a Comment