सलमानने पाठविलेल्या टाक्या मिळाल्या

बीड – मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेला मदतीचा हात देत बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या ‘ बीईंग ह्युमन ‘ या संस्थेने पाठवलेल्या पाण्याच्या १०० टाक्या बुधवारी बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. यामधील साडेसातशे टाक्या बीड जिल्ह्यातील दुष्काळी जनतेसाठी मिळणार आहेत.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तब्बल अडीच हजार पाण्याच्या टाक्या देण्याचा निर्णय सलमान खानच्या ‘ बीईंग ह्युमन ‘ या संस्थेने घेतला आहे, यातील साडेसातशे टाक्या बीड जिल्ह्यातील दुष्काळी जनतेसाठी मिळणार आहेत. तीन टप्प्यात या टाक्या बीडला येणार असून , पहिल्या टप्प्यातील शंभर टाक्या बुधवारी बीडमध्ये दाखल झाल्या. या पाण्याच्या टाक्या घेऊन आलेले ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला.

बीडला मिळणा-या साडेसातशे टाक्यांपैकी दीडशे टाक्या बीडला, गेवराई आणि आष्टीला प्रत्येकी पावणेदोनशे टाक्या, सव्वाशे टाक्या पाटोदा आणि शिरूर तालुक्याला दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण भामरे यांनी दिली. या टाक्या दुष्काळी तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे पाठवण्यात येत आहेत. सलमान खानने दिलेली मदत खूप मोलाची असून , मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना सलमानने ठेवलेल्या आदर्शाबद्दल बीडमध्ये त्याचे कौतुक होत आहे.

Leave a Comment