राजस्थानला मिलरला रोखावे लागणार

मोहाली- आयपीएलमधील प्ले ऑफ लढतीत जवळ येऊ लागल्या असल्यामुळे प्रत्येक संघाला आता विजयासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. आठ सामने जिंकणार्‍या राजस्थान रॉयल्सला गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना करावा लागणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आतापर्यंत पाच लढतींमध्ये विजय मिळवले असून यामध्ये डेव्हिड मिलर या दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूने सिंहाचा वाटा उचलला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनपेक्षित कामगिरी करणार्‍या किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ राजस्थान रॉयल्सलाही हरवू शकतो. म्हणूनच राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सला मिलरला कोणत्याही परिस्थितीत रोखावेच लागणार आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबने गेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करीत आत्मविश्‍वासाची कमाई केली.१९१ धावांचा पाठलाग करणार्‍या किंग्ज इलेव्हन पंजाबला देदीप्यमान विजय मिळवून दिला. त्याच्या अफलातून फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने विराट कोहलीच्या संघाला धूळ चारली. यावेळी त्याने अवघ्या ३७ चेंडूंत शतक झळकावले. त्यामुळे त्याला रोखणे महत्वाचे आहे.

दुसरीकडे द्रविड, अजिंक्य रहाणे, शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी, सिद्धार्थ त्रिवेदी, जेम्स फॉकनर, केवोन कूपर आणि संजू सॅमसन हे क्रिकेटपटू फॉर्ममध्ये असल्यामुळे राजस्थान रॉयल्सने स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी आतुर असतील. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयाची नितांत गरज आहे, अन्यथा त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागणार आहे.

Leave a Comment