मराठीविरोधी सरकारच्या पराभवाचा आनंदच- ठाकरे

मुंबई, -कर्नाटकमधील मराठीविरोधी सरकारच्या पराभवाचा आनंदच झाल्याची प्रतिक्रीया शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या प्रतिक्रीयेतून त्यांनी अप्रत्यक्षपणे कर्नाटकमधील भाजपच्या कारभारावरच टीकास्त्र सोडल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेना हा भाजपचा
मित्रपक्ष आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात बाजी मारूनकाँग्रेसने भाजपला सत्तेवरून पायउतार केले. या निकालाबाबत उद्धव यांनी
येथे पत्रकारांना प्रतिक्रीया दिली. कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय करणारे सरकार गेल्याचा मला आनंदच आहे. मागील पाच वर्षांत कर्नाटकात मराठीजनांची गळचेपी करणारे अनेक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आता नवे सरकार तरी मराठी भाषिकांना न्याय देईल अशी आशा वाटते, असे ते म्हणाले. याप्रतिक्रीयेतून मी भाजपवर नव्हे तर विशिष्ट सरकारवर टीका केली आहे, अशी
पुस्तीही त्यांनी जोडली. याशिवाय, मित्रपक्षाला आणखी दिलासा देताना ते म्हणाले, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच बाजी मारेल.

अर्थात, उद्धव यांनी कर्नाटकच्या निकालाबाबत दिलेली प्रतिक्रीया भाजपला रूचलेली दिसत नाही. त्यातूनच उद्धव यांचे वक्तव्य आश्‍चर्यकारक आणि खेदजनक असल्याची प्रतिक्रीया भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली आहे.

Leave a Comment