मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठाची भाषा सल्लागार समितीची मागणी

पुणे, दि. 8 (प्रतिनिधी) – ‘मराठी भाषा संवर्धन आणि सुधारणा यासाठी स्वंतत्र विद्यापीठ आवश्यक, विविध ज्ञानशाखा मराठी असाव्यात, उपयोजित मराठी वापरात यावी, मराठी शाळांची दुरावस्था सुधारावी, वेगवेगळ्या भाषेतील लोक लिहिते झाले पाहिजे, याप्रकारेच मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यास हातभार लागेल, अशी चर्चा बुधवारी भाषा सल्लागार समितीची बैठकीत झाली.

राज्याचे मराठी भाषा विषयक धोरण निश्‍चित करण्यासाठी ज्येष्ठ समीक्षक आणि 86 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समिती तयार करण्यात आली. या समितीतर्फे भाषा धोरणाचा मसुदा शासनाकडे सादर केला जाणार आहे. यापूर्वी सहविचार बैठकाच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपर्‍यातून विषयतज्ज्ञ, अभ्यासक यांच्याकडून भाषा संवर्धन, जपवणूक व सुधारण्यासाठी सूचना मागविण्यात येत आहे. यासंदर्भातील पहिली बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झाली. यावेळी साहित्य परिषदेच्या व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, भाषा सल्लागार समितीचे सदस्य अनिल गोरे यांच्यासह शहरातील भाषातज्ज्ञ व अभ्यासक उपस्थित होते.

बैठकीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. विद्यागौरी टिळक यांनी नवी पिढीतील भाषा ज्ञान वाढविणे आवश्यक आहे. वेगळ्या भाषेतील लोक लिहिते होणे आवश्यक असल्याचे सूचविले. तर मराठीत प्रमाणभाषा असणे आवश्यक असून मराठी प्राध्यापक आणि शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, असे मेधा सिधये यांनी सांगितले. तर प्रकाशक अरुण जाखडे यांनी मराठतील बोली भाषाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. डॉ कल्याणी दिवेकर यांनी भाषा सेवक होणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले. यानंतर समितीची पुढील बैठक 12 मे रोजी नाशिक येथे होणार आहे. या सहविचार बैठकीतून उपस्थित होणार्‍या मुद्द्यांच्या आधारे भाषा धोरणाचा मसुदा तयार करण्यात येईल, आणि तो जून महिन्यात राज्य शासनासमारे सादर केला जाईल., असे डॉ. कोत्तापल्ले यांनी सांगितले.

Leave a Comment