‘नवा बेबनाव अँट वडाला’

बॉलीवूडच्या नट्यांतील शीतयुद्ध नवीन नाही. काही जणींमध्ये एवढे टोकाचे
वितुष्ट असते की, त्या सतत एकमेकींना पाण्यात पाहत असतात व समोरचीवर
कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. एकाच क्षेत्रात काम करताना व आपले
वर्चस्व दाखवून देण्यासाठी संघर्ष करताना एकमेकींसोबत चकमक होणे अटळ
असते. मात्र दोन चांगल्या मैत्रिणींमध्ये असा बेबनाव होतो तेव्हा साहजिकच
नवल वाटते. प्रियंका चोप्रा व कंगणा राणावत या जवळच्या मैत्रिणी म्हणून
ओळखल्या जाणार्‍या नट्यांमध्ये सध्या असाच कलगीतुरा रंगला आहे.

हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘शुटआउट अँट वडाला’ या चित्रपटात कंगणा प्रमुख
नायिकेच्या भूमिकेत आहे, तर प्रियंकाने त्यात एक आयटम साँग केले आहे. आता
बॉलीवूडमध्ये प्रियंकाचे स्थान व कारकीर्द कंगणाच्या तुलनेत सरस आहे हे
कुणीही मान्य करेल. म्हणून या चित्रपटात प्रियंकाचे केवळ एका गाण्यात
दर्शन होत असूनही प्रसिद्धीमध्ये तिला जास्त महत्त्व देण्यात आले आहे आणि
होर्डिंगवरही तिचीच छबी अधिक ठळकपणे दाखविलेली आहे. याच कारणामुळे
कंगणाचा तिळपापड होत आहे. आपली ही नाराजी ती सगळ्य़ांसमोर व्यक्त करत आहे.

अर्थात पडद्यावर झळकलेल्या या चित्रपटामध्ये आपण काहीच बदल करू शकत नाही
हेही तिला चांगल्याप्रकारे माहीत आहे. पण भविष्यात येणार्‍या संभाव्य
अडचणींची चिंता तिला आतापासून सतावू लागली आहे. चालू वर्षाच्या अखेरीस
तिचा आणखी एक चित्रपट येत आहे आणि त्यामध्ये प्रियंकाही तिच्या जोडीला
असेल. या चित्रपटात प्रियंकाची भूमिकाही कंगणाच्या तोडीस तोड आहे. या
चित्रपटावेळीही ‘शुटआउट अँट वडाला’प्रमाणेच प्रियंकाला जास्त महत्त्व
दिले गेले तर..!

ही भीती तिला वाटत आहे. म्हणूनच तिने निर्माता व दिग्दर्शकाची भेट घेऊन
कोणत्याही परिस्थितीत आपल्याला प्रियंकापेक्षा कमी फुटेज मिळता कामा नये,
असे आत्ताच बजावून ठेवले आहे. अर्थात कंगणाचे हे म्हणणे किती ऐकले जाते व
तिला खरोखरच प्रियंकाएवढे महत्त्व दिले जाईल का? याबाबत शंकाच आहे.

Leave a Comment