सरकारी बँकांची काळ्याशी हातमिळवणी

सरकारी बँका काळा पैसा पांढरा करण्यास मदत करतात. तो पैसा बँकांत ठेवी म्हणून वापरतात. त्यावर व्याज देतात. हा पैसा आणि त्यातून कमावलेले सोने गुपचुप ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून देतात. या नंबर दोनच्या पैशावर व्याजही देतात. शिवाय हा पैसा विमा कंपनीत गुंतवला तर तो पांढराही होतो, त्यावर व्याजही मिळते, जीवाची जोखीम रहात नाही आणि शिवाय त्या पैशावर सरकारच्या करसवलतीही मिळतात. त्या मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी बँकेतच बसलेले असतात. काही खाजगी विमा कंपन्यांचे विमे अर्धवट राहिलेले असतात. त्यात काही नंबर दोन वाले आपला पैसा गुंतवतात आणि तो पैसा त्या विमेदाराचा आहे असे भासवतात. त्यावरचे लाभ मात्र या नंबर दोनवाल्याला मिळतात. अशा अर्धवट राहिलेल्या पॉलिसीजची नावे सांगायला विमा कंपनीचा माणूस बँकेत बसलेला असतो. हे सारे संगनमताने चालते. हा सारा उपद्व्याप काळा पैसा पांढरा करण्यासाठी चाललेला असतो. या कारस्थानात सरकारी बँका आहेत आणि आयुर्विमा महामंडळही आहे.

हा सारा प्रकार कोब‘ा या वाहिनीने उघड केला तेव्हा बँकांनी मोठाच सावध पवित्रा घेतला. बँकेत पैसे ठेवायला आला की तो पैसा ठेवून घेणे हे आपले कामच आहे, तो पैसा काळा की पांढरा हे तपासून बघण्याचे काही कारणच नाही. तेव्हा काळा पैसा पांढरा करण्याचा आरोप आपल्याला लागत नाही असे बँकाचे म्हणणे होते. बँकेत ठेवली जाणारी रक्कम काळी की पांढरी याच्याशी आमचा काय संबंध ? आता यावर सरकारनेच काही उपाय योजिले आहेत. बँकेत ठेवायला आलेली रक्कम फार मोठी असेल तर एक फॉर्म भरून घेतो. तसा तो भरून घेतला की बँकेचे काम संपले. या ठिकाणी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रश्‍नच कोठे येतो? हा बँकेचा खुलासा पटण्यासारखा आहे. त्यांनी तर फॉर्म भरून घेतलेला असतो मग तो पैसा काळा की पांढरा हे आयकर खात्याने बघून घ्यावे. कोब‘ाच्या आरोपानंतर बँकांनी तसा खुलासा केला होता आणि तो सर्वांना पटला होताही पण कोब‘ाने आणखी एक स्टिंग ऑपरेशन केले आणि बँकांच्या अधिकार्‍यांनाच बोलते केले. तेव्हा बँकांच्या अधिकार्‍यांनी भलतीच कबुली दिली. आपण काळा पैसा अज्ञानाने नाही तर समजून उमजून घेतो एवढेच नाही तर अशा पैशाला प्रोत्साहनही देतो, कर चुकवून हा पैसा कसा गुंतवावा याचे मार्गदर्शनही करतो असे या अधिकार्‍यांनी उघडपणे सांगून टाकले.

या प्रकाराने आता साराच पोलखोल झाला आहे. आता आणखी एक प्रश्‍न आहे. बँका फॉर्म भरून घेतला की मोकळ्या होतात आणि फॉर्मची छाननी करण्याची जबाबदारी आयकर खात्याची असते. पण आयकर खातेही तशी काही छाननी करीत नाही. कारण तेही सरकारचेच खाते आहे. म्हणजे एकुणात काळा पैसा पांढरा करण्याकडे सरकार सोयिस्करपणे कानाडोळा करीत आहे. काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेला वठणीवर आणण्याऐवजी सरकारच त्याला आपल्या पोटात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. ही एक प्रकारची शरणागतीही आहे आणि स्वत:ची पैशाची चणचण कमी करण्याचाही प्रयत्न आहे. एकेकाळी काळा पैसा हा कलंक मानला गेला होता. पण आता आपणा सर्वांनाच त्याचे काही वाटेनासे झाले आहे. पण आपल्या सर्वांप्रमाणेच सरकारलाही काळ्या पैशाचे काही वाटेनासे झाले आहे ही मात्र मोठीच दुर्दैवाची बाब आहे. आता हा नंबर दोनचा पैसा सरकारी कृपेने पांढरा होत आहे. सरकारचे देशातल्या अनेक महत्त्वाच्या यंत्रणांवरचे नियंत्रण कसे कमी होत आहे याचे हे निदर्शक आहे. सरकारने काळा पैसा खणून काढला पाहिजे पण तसे न करता सरकारच या काळ्या धनाला संरक्षण देत आहे एवढेच नाही तर त्यावर व्याजही देत आहे.

विम्यात पैसे गुंतवले की, अनेक करसवलती मिळतात म्हणून असा काळा पैसा विमा कंपन्यांतही गुंतवला गेला आहे आणि त्यातून अनेक करांची कपात मिळवली गेली आहे. ़1990 च्या दशकापर्यंत अशा पैशांविषयी चर्चा होत असे कारण आपली अर्थव्यवस्था नियंत्रित होती. नंतर मुक्त अर्थव्यवस्था आली आणि पैसा वाढला. पैसे कमावण्याला फाजील महत्त्व आले. पैसा कसा कमावला आहे याचा काही विधिनिषेध राहिला नाही. पूर्वी समाजातले काही काळा पैसा बाळगणारे लोक या पैशाला नंबर दोनचा पैसा असे म्हणत असत. ते पैसे बँकेत ठेवता येत नसत. त्यांचा व्यवहार नगदीतूनच होत असे आणि त्या व्यवहाराची पावती कोणीच कोणाला मागत नसे. समाजात प्रामाणिकपणाने धंदे करणारे लोक चेकने व्यवहार करतात. पैसे चेकने दिले की, त्याची नोंद होेते पण त्याची त्यांना भीती नाही कारण त्यांना तो पैसा काही लपवायचा नसतो. निढळाच्या घामाचा असतो. पण नंबर दोनच्या पैशात शक्यतो कोठेही व्यवहाराची नोेंद होत नाही. करता येत नाही. समाजात ‘पैसा कसाही कमवा पण कमवा म्हणजे झाले’ याला महत्त्व आले. त्यात काही चूक आहे असे त्यांनाही वाटत नाही. ती काही फार मोठी चूक आहे, देशद्रोह आहे असे कोणालाही वाटत नाही. उलट एखाद्या व्यवहारात किती पैसे पांढरे द्यायचे आणि किती पैसे काळे द्यायचे याची चर्चा उघडपणे होते. इतके आपण सर्वजणच काळा पैसा हाताळण्यास निर्ढावलो आहोत.

Leave a Comment