मोहाली- डेव्हिड मिलरच्या तुफानी नाबाद शतकाच्या जोरावर आपीएलच्या सहाव्या हंगामात किंग्ज इलेवन पंजाबने बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत बंगळूरूने पंजाबपुढे विजयासाठी १९१ धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. मात्र पंजाबने यंदाच्या हंगामातील आपली
सर्वोत्तम कामगिरीकरत बंगळूरूला पंजाबी तडका दिला.त्याआधी नाणेफेक जिंकून पंजाबने बंगळूरूला फलंदाजीकरण्याची संधी दिली.
स्पर्धेतील आजवरची तडाखेबाज खेळी करणा-या बंगळूरुच्या फलंदाजांनी दणकेबाद सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा आणि ख्रिस गेल यांनी पहिल्या विकेटसाठी
१०२ धावांची भागिदारी केली. गेलने ३८ चेंडूत ६१ धावा केल्या. त्यानंतर पुजारा देखील ५१ धावांवर बाद झाला. मग अखेरच्या षटकात एबी.डिव्हिलियर्सने
१९ चेंडूत ३८ धावा लुटल्या आणि पंजाबपुढे १९१ धावांचे आव्हान उभे करुन दिले.
विजयासाठी १९१ धावांचे डोंगर पार करण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली नाही. सलामीचे फलंदाज मनदीप सिंग १६ धावांवर
तर शॉन मार्श केवळ सहा धावा काढून बाद झाला. पंजाबची अवस्था तीन बाद ५१ झाली होती. मात्र अशा बिकट परिस्थितीत डेव्हिड मिलरने सामना एक हाती
फिरवला. त्याने केवळ ३८ चेंडूत सात षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीने पंजाबने तब्बल १२ चेंडू
आणि सहा गडी राखून बंगळूरूवर विजय मिळवला.