नवी दिल्ली- गेल्या २१ दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातवरण होते. हे वातावरण दूर करण्यासह चीनने केलेली घुसखोरी थोपविण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. मात्र त्यासाठी तडजोड करीत असताना भारत सरकार नरमले आहे. तडजोडीनुसार सरकारी आदेशामुळे भारतीय संरक्षण दलाने चुमार येथील बंकर तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय चीनच्या दबावाखाली घेतला असल्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या २१ दिवसांपासून चीनने भारताच्या हद्दीत काही विवादास्पद हालचाली घुसखोरी केली होती. चीनने दौलत बेग ओल्डी क्षेत्रात १९ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी करुन लष्करी चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते. सरकारी आदेश नसल्यामुळे तणाव दूर करण्यासाठी शस्त्रांऐवजी ध्वज बैठकीचा (फ्लॅग मिटिंग) पर्याय स्वीकारण्यात आला. ध्वज बैठका आणि दोन्ही देशांच्या उच्चपदस्थांनी पडद्यामागे केलेली चर्चा यातून तोडगा निघाला. चीनच्या सैनिकांनी डीबीओ क्षेत्रात केलेले बांधकाम स्वतः नष्ट करायचे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मागे स्वतःच्या हद्दीत परत जायचे, त्याबदल्यात भारताने चुमार येथील स्वतःचे बंकर तोडून टाकायचे तसेच दोन्ही देशांनी १५ एप्रिल रोजी असलेली लष्करी स्थिती कायम राखायची असा निर्णय या बैठकीत झाला असल्याचे समजते.
काही दिवसापूर्वीच चिनी सैन्याच्या आक्रमक हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठीच भारतीय लष्कराने चुमार येथे बंकर बांधायचे काम सुरू केले होते. मात्र चीनने आक्रमक हालचाली करुन भारतावर दबाव आणला आणि चुमार येथील काम बंद पाडले आहे. सरकारी अधिका-यानी मात्र सर्व आरोप फेटाळत, तणाव दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचे काही निर्णय घेतले आहेत, असे सांगितले.