आतंकवाद्यामुळे पर्यटक वाहनांना प्रवाशांची माहिती ठेवणे बंधनकारक

पुणे, दि. 7 (प्रतिनिधी) – दहशतवाद्यांच्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर पर्यटक परवाना घेणार्‍या टुरीस्ट वाहनांना; तसेच तात्पुरत्या स्वरूपात प्रवासी वाहतुकीसाठी विशेष परवाना घेणार्‍या बस वाहतूकदारांनी यापुढे प्रवाशांची नावे व पत्त्यासह सविस्तर यादी सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे प्रवासी वाहतूक करणार्‍या बसला झालेल्या अपघाताचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. त्यावर, प्रवाशांच्या यादीबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील, अशी भूमिका सरकारने मांडली होती. त्यानुसार, प्रवाशांचे नाव, पत्ता, वय आणि प्रवासाचे आरंभ व अंतिम स्थान याची माहिती देणारी प्रत बसवाहतूकदारांनी प्रवासादरम्यान ठेवणे आवश्यक असल्याचे परिपत्रक परिवहन आयुक्तांनी काढले आहेत.

मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार पर्यटक परवान्यासाठी प्रवाशांच्या माहितीची सविस्तर यादी तीन प्रतींमध्ये सादर करणे बस वाहतूकदारांवर बंधनकारकच आहे. यातील एक प्रत वाहनातून बरोबर नेणे आवश्यक असून, दुसरी प्रत जतन करून ठेवण्याच्या सूचनाही यापूर्वी दिल्या गेल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सरकारने पुन्हा एकदा परिपत्रकाद्वारे या नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना दिले आहेत.
एखाद्या दुर्दैवी अपघातात, जखमी किंवा मृत प्रवाशांच्या नातेवाईकांशी वेळीच संपर्क साधण्यासाठी अथवा त्यांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी, यासाठी प्रवाशांची यांदी आणि त्यांच्या संपर्काचा तपशील उपयोगी ठरतो. त्यामुळे , अखिल भारतीय पर्यटक परवाना आणि विशेष परवाना घेणार्‍या बस वाहतूकदारांकडून त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचनाही परिवहन कार्यालयांना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment