मुंबई: गेल्या वर्षी आयपीएल सामन्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचा फ्रँचाईझी मालक शाहरुख खान यांनी बराच गोंधळ घातला होता. या प्रकरणात एमसीएच्या कार्यकारिणीने शाहरुख खानवर वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यापासून पाच वर्षांची बंदी घातली होती. त्यामुळे त्याच्या विरोधातली मुंबई क्रिकेट असोसिएशनची कठोर भूमिका अजूनही कायम आहे. शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर प्रवेश देऊ नका, अशी विनंती एमसीएने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे त्याला प्रवेश मिळणार की नाही यावरून संधीग्द वातावरण आहे.
वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये आयपीएलचा सामना होत आहे. या सामन्यानिमित्ताने शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर घुसता येऊ नये या दृष्टीने एमसीएने मुंबई पोलिसांना निवेदन देण्याची खबरदारी घेतली असल्याचे समजते .
आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या सामन्यात मुंबई आणि कोलकाता संघांत वानखेडेवर झालेल्या सामन्यानंतर शाहरुख खानने एमसीएचे सुरक्षारक्षक विकास दळवी यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्यानंतर त्याने एमसीएच्या पदाधिका-यांना उद्देशून शिवीगाळही केली होती. या प्रकरणात एमसीएच्या कार्यकारिणीने शाहरुख खानवर वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करण्यापासून पाच वर्षांची बंदी घातली होती. शाहरुख खानविरोधातल्या त्या कठोर भूमिकेवर एमसीए अजूनही ठाम आहे. एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी मरीन लाईन्स पोलीस स्थानकाला दिलेल्या पत्रात शाहरुख खानला स्टेडियममध्ये प्रवेश न करू देण्याची विनंती केली आहे.