
नवी दिल्ली, दि.७-भारतीय हद्दीतील लडाखमध्ये घुसखोरी करणार्या चिनी सैनिकांनी काल माघार घेतली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सुमारे तीन आठवडे
निर्माण झालेला तणाव निवळला. या पार्श्वभूमीवर, तणाव निवळण्यासाठी चीनशी कुठलीही सौदेबाजी करण्यात आली नसल्याचे केंद्र सरकारमधील सूत्रांनी
स्पष्ट केले आहे.
चिनी सैनिकांनी 15 एप्रिलला भारतीय हद्दीत घुसखोरी केली. लडाखमध्ये चिनी सैनिकांनी 19 किलोमीटर आतपर्यंत मुक्काम ठोकला. त्यानंतर भारतानेही
सुरक्षेचा उपाय म्हणून आपले लष्करी जवान संबंधित ठिकाणी सज्ज ठेवले.त्यावरून भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या
पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या काल झालेल्या बैठकीत सैन्य माघारीचा निर्णय घेण्यात आला. तणाव निवळण्याच्या उद्देशाने सौदा झाला असावा, अशाप्रकारच्या तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, सरकारी सूत्रांनी आज कुठली सौदेबाजी झाल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत (एलएसी) शांतता आणि मूळ स्थिती कायम ठेवण्याबाबत चर्चा करण्यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाल्याचेही या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तणावाची स्थिती संपुष्टात आल्याच्या बाबीला चीनकडूनही पुष्टी देण्यात आली. मात्र, संबंधित क्षेत्रात 15 एप्रिलपूर्वी असणारी मूळस्थिती कायम राहणार की नाही याबाबत चीनकडून मौन पाळण्यात आले.