कर्नाटकात काँग्रेसला दिलासा लाभणार

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाला कर्नाटकमध्ये झालेला भ्रष्टाचार व पक्षातील बेदिलीमुळे सत्तेवरून पायउत्तार व्हावे लागण्याची चिन्हे आहेत. रविवारच्या मतदानात तब्बल ७०.२३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभेच्या २२३ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाचा कौल भाजपच्या विरोधात व काँग्रेसच्या बाजूने गेल्याचा अंदाज विविध ‘एग्जिट पोल्स ‘ नी वर्तविला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला ११३ हा आकडा गाठण्यात काँग्रेसला यश मिळेल , असे हे अंदाज सांगत आहेत.

रविवारी कर्नाटकमधील विधानसभेच्या २२३ जागांसाठीमतदान झाले. यावेळी तब्बल ७०.२३ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यांनी नेमका काय कौल दिला, ते अधिकृतरीत्या येत्या ८ मे रोजी, बुधवारी स्पष्ट होणार आहे. मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्यांचे एजन्सींचे ‘ एग्जिट पोल्स ‘ चे अंदाज जाहीर केले. हे अंदाज निदान कर्नाटकपुरते तरी भाजपच्या पायांखालील वाळू सरकवणारे आहेत. विसर्जित विधानसभेत भाजपचे ११० आमदार होते. पाच अपक्षांच्या मदतीने त्यांनी सरकार तगवले होते. काँग्रेस ८०, तर सेक्युलर जनता दल २८ असे बलाबल होते.

कर्नाटकमध्ये सत्तेसाठी किमान ११३ आमदारांची कुमक आवश्यक आहे. टाइम्स नाऊने तर भाजपला १३२ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. सध्याच्या सत्ताधारी भाजपला जेमतेम ५० ते ६० जागांची मजल मारता येईल. मोठा गाजावाजा करणा-या, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीच्या (कजप) पारड्यात फार तर १३ जागा पडतील , असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकंदरीत सर्व ‘ एग्जिट पोल्स ‘ चे अंदाज मात्र चक्रावून टाकणारे आहेत.

Leave a Comment