नवी दिल्ली, दि.४ – काँग्रेस नेते सज्जनकुमार यांना शीखविरोधी दंगलीत निर्दोष सोडण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिल्यानंतर आज सलग पाचव्या दिवशीही दंगलपीडीतांनी निदर्शने केली. आंदोलकांपैकी एका महिलेने आमरण उपोषण सुरू केले आहे. दक्षिण दिल्लीत निझामुद्दिनजवळ आंदोलकांच्या एका गटाने गजबजलेला मथुरा रस्ता रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. हा रस्ता राजधानीतील मध्यवस्तीला जोडणारा असल्याने दिल्लीकरांची चांगलीच पंचाईत झाली.
दिल्लीत शीखांची निदर्शने सुरूच
जंतर मंतर येथे निरप्रीत सिंग यांनी कुमार यांना शिक्षा देण्याच्या मागणीसाठी कालपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. कुमार यांच्याविरूद्धच्या खटल्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याची त्यांची मागणी आहे. कुमार यांना निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि कुमार विश्वाणस यांनीही त्यांच्यासोबत एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करून त्यांना पाठिंबा दिला.