कॅम्पाकोला रहिवाश्यांना पाच महिन्यांची मुदत

मुंबई, दि. ३ – येथील वरळीमधील ‘कॅम्पाकोला’ या इमारतीमधील १४० अनधिकृत फ्लॅट्सवर कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज पाच महिन्यांची स्थगिती दिली. त्यामुळे रहिवाश्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता कोणतेही कारण न देता येत्या पाच महिन्यात घरे खाली करण्याची लेखी हमी येत्या चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर द्यावी, असा आदेशही खंडपीठाने दिला आहे. याच इमारतीत गानकोकिळा लता मंगेशकर यांचाही फ्लॅट् आहे.

’कॅम्पाकोला’ कम्पाऊंडमधील सात इमारतींतील १४० घरे अनधिकृत ठरली आहेत. याप्रकरणी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते.

त्यावर इमारतींतील ज्येष्ठ रहिवाशांची प्रकृती व आर्थिक समस्येचा मुद्दा मांडत उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पालिकेने कारवाईसाठी २ मे ही नवीन तारीख निश्चित केली. या कारवाईसाठी पालिकेने पूर्ण तयारीही केली. आज दुपारी तेथे पालिकेच्या अधिकार्‍यांचा लवाजमाही दाखल झाला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या आदेशानंतर हा तणाव निवळला.

Leave a Comment