जम्मू दि.३ – लाहौरच्या तुरूंगात भारतीय कैदी सरबजितवर हल्ला व त्यात त्याचा झालेला मृत्यू याची तीव्र प्रतिक्रिया भारतात उमटली आहे. आज सकाळीच जम्मू येथील कोट बालवल जेलमधील पाकिस्तानी कैद्यावर अन्य कैद्यांनी हल्ला चढविल्याची घटना घडली. जखमी पाकिस्तानी कैद्याचे नांव सलाऊद्दीन असल्याचे समजते. त्याच्यावर कुर्हालडीने हल्ला करण्यात आला असून त्याला जम्मूच्या जीएमसी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले गेले आहे.
लाहौर तुरूंगातील हल्ल्यानंतर जिना रूग्णालयात मरण पावलेल्या सरबजितवर आज भारतात त्याच्या गांवी अत्यंसंस्कार होत असतानाच जम्मू तुरूंगात हा प्रकार घडला. सरबजितवर हल्ला झाल्यापासूनच भारत पाकिस्तान मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतातील ज्या तुरूंगात पाकिस्तानी कैदी आहेत तेथील सुरक्षा अधिक कडक करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. भारतीय तुरूंगात पाकिस्तानचे सुमारे २०० कैदी आहेत.
जम्मू तुरूंगातील हल्ल्यानंतर दिल्लीच्या तिहार कारागृहाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या तुरूंगातही २० पाकिस्तानी कैदी आहेत.