चॅलेंजर पुढे वॉरिअर्स नमले

पुणे दि.३ — आयपीएलच्या सहाव्या हंगामात गुरुवारी झालेल्या साखळी सामन्यात बंगळूरू चॅलेंजर्सने पुणे वॉरियर्सवर १७ धावांनी विजय मिळवला. बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सने प्रथम फलंदाजी करत पुणे वॉरियर्सपुढे विजयासाठी १८८ धावाचे आव्हान दिले होते. मात्र पुणे संघाला २० षटकात नऊ बाद १७० धावा करता आल्या. बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बंगळूरूकडून सौरभ तिवारी आणि एबी.डिव्हिलियर्स यांनी अर्धशतकी खेळी केली. बंगळूरूने २० षटकात तीन बाद १८७ धावा केल्या.

विजयासाठी १८८ धावांचे विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे संघाला २० धाव संख्येवर पहिला धक्का बसला.  त्यानंतर मात्र या हंगामात सपशेल अपयशी ठरलेल्या रॉबिन उथप्पाने जबरदस्त खेळी करत पुणे संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रॉबिनने ४५ चेंडूत ७५ धावा केल्या. त्यात पाच षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. मात्र रॉबिनचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही फलंदाजास मोठी धाव संख्या उभी करता आली नाही. पुण्याचे फलंदाज ठरावीक टप्प्याने बाद होते गेले.

या सामन्यानंतर बंगळूरूचे अकरा सामन्यातून सात विजयासह १४ गुण झाले आहेत. बंगळूरू संघ गुणतक्त्यात दुस-या स्थानावर आहे. तर पुण्याचा संघ नऊ पराभवासह गुणतक्यात शेवटच्या स्थानावर आहे.

बंगलोरचा यशस्वी गोलंदाज विनयकुमार याही सामन्यात प्रभावी ठरला. त्याने ३१ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मुरली कार्तिकने दोन, तर आरपी सिंग, मोईझेस हेन्रिक्स आणि ख्रिस गेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. बंगलोरच्या एबी डिव्हिलियर्सला या सामन्यातल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला.

Leave a Comment