सरबजित सिंगचे निधन

लाहोर – सहा दिवस मृत्यूशी झुंज देणारा भारतीय कैदी सरबजित सिंग याचे आज अखेर निधन झाले. २६ एप्रिल रोजी लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात पाकिस्तानी कैद्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तो कोमात गेला होता. लाहोर येथील जिन्ना रुग्णालयात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला.

कोट लखपत तुरुंगात गेल्या २३ वर्षापासून कैदेत असलेल्या सरबजित सिंग याच्यावर २६ एप्रिल रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लाहोरमधील जिन्ना रुग्णालयात उपचार सुरू होते. कोमाच्या स्थितीची तपासणी करणा-या ग्लॅसगो कोमा चाचणीमध्ये तो अत्यवस्थ अवस्थेत पोहोचल्याचे आढळून आले होते. सरबजीतच्या हृदयाचे ठोके सुरू होते , मात्र त्याच्या मेंदूच्या कोणत्याही क्रिया होत नव्हत्या.

दरम्यान, सरबजितचे शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांचे एक विशेष पथक बनविण्यात आले आहे. सरबजीतच्या प्रकृतीची गंभीर स्थिती लक्षात घेऊन पाकमधील भारतीय उच्चायुक्त शारत साभरवाल यांनी पाकच्या परराष्ट्र सचिवांची भेट घेऊन त्याच्या सुटकेची मागणी केली होती.