सरबजितचा अखेर मृत्यू – शव भारतात आणणार

लाहोर दि. २ – पाकिस्तानात बॉम्बस्फोट करून १४ जणाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या व गेली २२ वर्षे तुरूंगात काढलेल्या भारतीय कैदी सरबजित सिंग याचा लाहोरच्या जिना रूग्णालयात आज पहाटे हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला. सरबजितचा मृतदेह भारतात नेण्यास पाक सरकारने परवानगी दिली असून तो आज वा उद्या भारतात आणला जाईल व त्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील असे समजते.

गेल्या शुक्रवारी सरबजितवर कोल लखपत जेलमधील सहा कैद्यांनी हल्ला केला होता आणि त्याला विटा आणि चाकूने जबर मारहाण केली होती. तेव्हापासून सरबजित कोमात होता आणि त्याच्यावर जिना रूग्णालयात उपचार सुरू होते. पहाटे दीडच्या सुमारास सरबजितची हृदयक्रिया बंद पडल्याचे मेडिकल टीमचे प्रमुख मोहम्मद शौकत यांनी जाहीर केले. ४९ वर्षीय सरबजितच्या कवटीला या हल्ल्यात फ्रॅक्चर झाले होते आणि त्याला अनेक गंभीर जखमाही झाल्या होत्या. या प्रकरणी अमर अफताब आणि मुदस्सर या दोन कद्यांना अटकही करण्यात आली होती.

सरबजितच्या मागे पत्नी सुखप्रितकौर आणि पूनम व स्वप्नदीप या दोन मुली आहेत. सरबजितचे कुटुंबिय नुकतेच त्याला पाकिस्तानात भेटून परत आले होते. १९९० सालीच सरबजितला बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी सुनावली गेली होती आणि त्याचा दयेचा अर्ज परवेझ मुशर्रफ यांनी फेटाळला होता. सरबजितला चुकीने दोषी धरले गेले असल्याने त्याची भारतात पाठवणी करावी यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते मात्र त्याला यश आले नव्हते.

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सरबजिच्या कुटुंबियांची भेट घेतली असून सवतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.