रोहितचे दमदार पुनरागमन

मुंबई – गेल्या काही दिवसापासून रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून संघाला सलग विजय मिळवून देण्यात तो यशस्वी झाला आहे. त्यामध्ये त्याच्या वैयक्तिक कामगिरीचा मोलाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. तसे पहिले तर रोहित शर्मा २००७मध्ये भारताचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून नावारूपास आला होता . पहिल्यावहिल्या टी – २० वर्ल्डकपमधील विजयानंतर रोहितकडे त्या नजरेने क्रिकेटचाहते पाहात होते . सहावर्षांनंतर आयपीएल – ६मधील कामगिरीत त्याने सुधारणा केली आहे. त्यामुळे रोहितच्या कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळेल असे वाटते.

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहितने गेल्या तीन सामन्यापासून स्वीकारल्याने या संघाला सलग विजय मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे . गेल्या आठवड्यात मुंबईचा संघ सहा सामन्यांतून केवळ तीन विजय मिळवून सहाव्या स्थानावर होता . कर्णधार म्हणून रिकी पाँटिंगची जादू चालत नव्हती .पण रोहितच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आणि सलग तीन सामने मुंबई इंडियन्सने जिंकले .

रोहितप्रमाणे गुणवत्ता असलेले फार कमी खेळाडू आहेत. वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करण्याची क्षमतेच्या जोरावर रोहितने यश मिळवून दिले आहे. त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात मारलेले षटकार हे ताकदीची प्रतीक नव्हते तर त्यात निव्वळ अचूक टायमिंग हाच निकष होता . १०० वनडे सामन्यांच्या जवळ पोहोचलेल्या रोहितला कसोटी पदार्पणापासून मात्र वंचित राहावे लागले आहे . काहीजणांच्या मते तो फिटनेसमध्ये कमी आहे , तर काहींना त्याच्या मनोबलाबाबत शंका आहे. कोणी काहीपण म्हणत असले तरी यावेळेस रोहितने आयपीएलमध्ये मात्र कमाल केली आहे. त्याने सलग तीन सामन्यात विजय मिळवून देऊन आयपीएलमध्ये काहीसी कमाल केली आहे.

गेल्या काही सामन्यातील मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर एक गोष्ट मात्र नक्कीच अधोरेखित झाली आहे , ती म्हणजे रोहित हा दबावाखाली चांगली कामगिरी करतो . हे त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे वळण आहे , असे वाटते. येत्या काही सामन्यात त्याला गुणवत्तेला न्याय मिळउन देण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचे तो कशा प्रकारे सोने करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment