कुल्लू -मणीकरण

कुल्लू म्हणजे मुळचे कुलांतपीठ. बियास नदीकाठची सुंदर नगरी.एकापेक्षा एक सुंदर असलेल्या असंख्य दर्‍या, निसर्गरम्य डोंगरउतार, धुक्याची पारदर्शी चादर हळूच दूर करून येणारा उबदार सूर्यप्रकाश, हिरवीगार कुरणे, वाहते खळाळते झरे अशा सौंदर्यसामग्रीने नटलेले हे स्थळ पर्यटक, ट्रेकर्स, यात्रेकरू असे सार्‍यांनाच भुरळ घालणारे आहे.

kullu

हिमाचल म्हणजे देवभूमी. देवळांचा प्रदेश. कुल्लूही त्याला अपवाद नाही. या गावाच्या आसपास अनेक समाध्या, मंदिरे, पवित्र स्थाने आहेत. कुल्लू बसस्टॉपजवळच असलेल्या सुलतानपूर येथील रघुनाथ मंदिर ही या प्रदेशाची मुख्य देवता. या दरीत जेवढी म्हणून देवळे आहेत, त्यातील सर्व देव दसर्‍याला रघुनाथाच्या भेटीला येतात. म्हणजे पालख्या येतात. कुल्लू मनाली रस्त्यावरील वैष्णोदेवी मंदिर हे दुसरे महत्त्वाचे स्थान. पाच किलोमीटरवर असलेले भुवनेश्वरी मंदिर पहाडी पेंटींग्ज आणि सुंदर शिल्पकलेसाठी पाहायचे. विष्णू मंदिर आणि आठव्या शतकातले दियार जवळचे शिवमंदिर प्रचंड मोठे आणि आकर्षक दगडी कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहे.
kullu2
सुलतानपूरजवळचा रूपी पॅलेस कुल्लू शैलीतील मिनिएचर पेंटिग्जसाठी प्रसिद्ध असून या पेंटिग्जमध्ये मानवी आकृत्या नाहीत. १४ किमी अंतरावर असलेले बिजली महादेव हे २४६० मीटर उंचीवरचे मंदिर वैशिष्ठ पूर्ण आहे. मनसारी गावापासून ३ किमीचा ट्रेक करावा लागतो. हे शिवलिंग वारंवार वीज पडून भंगते आणि पुजारी ते पुन्हा स्थापन करतात म्हणून हा बिजली महादेव. येथून मणीकरण व्हॅलीचा देखावाही थक्क करणारा. ६ किमी अंतरावरचा पलानी फॉल्स लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मार्चमध्ये येथे जत्रा असते. प्रचंड मोठे नॅशनल पार्कही येथे असून तेथे कस्तुरीमृग, काळे अस्वल ,स्नो लेपर्ड असे प्राणी पाहता येतात.
kullu1
कुल्लूपासून ४५ किमीवर आहे मणीकरण. ही पार्वती व्हॅली म्हणूनही ओळखली जाते. शिवपार्वती या प्रदेशावर अगदी लुब्ध झाले होते अशी भावना आहे. तब्बल ११०० वर्षे ते या भागात होते. येथेच पार्वतीच्या कानातील डूल हरवला. शेष नागाने मोठमोठे फूत्कार टाकून पृथ्वीच्या पोटात गेलेला हा मणी बाहेर काढला. कर्ण मणी म्हणून हे मणीकरण. शेषाच्या फुत्कारांमुळे धरणीला भेगा पडल्या आणि त्यातून उष्ण पाण्याचे झरे बाहेर पडले. सल्फरयुक्त पाण्याच्या या झर्‍यात भाविक स्नान करतात कारण हे पाणी औषधी मानले जाते.

हिंदू आणि शीख या दोघांच्याही श्रद्धा असलेले स्थळ म्हणजे श्री रामचंद्र मंदिर. भितीवर येथे शिलालेख आहेत. येथील शिवमंदिर १९०५ सालच्या भूकंपात  कलले होते त्याला गुरू नानक यांनी भेट दिली होती असे सांगतात. मणीकरणला सुंदर गुरूद्वाराही आहे.  ट्रेकर्सना पर्वणी असलेला पीन पार्वतीपास ४८०६ मीटर उंचीवर असून हा पास सतलज आणि स्पिती व्हॅली जोडतो. हरिंदर पर्वत, पार्वती नदी ही आणखी सुंदर स्थळे पण सगळ्यात कडी म्हणजे ६९ किमीवर असलेले शोजा हे ठिकाण. २६९२ मीटर उंचीवरील हे ठिकाण अनेक सुंदर बंगले, नद्या , झरे, कुरणे, विविध प्रकारची जंगली फुले यांनी समृद्ध असून येथे आपल्याला मनसोक्त निसर्ग अनुभवता येतो. इच्छा असेल तर जवळचा जालोरी पास ट्रेक करायचा.

कुल्लूच्या हातमागावरच्या शाली अतिशय प्रसिद्ध आहेत. हिमाचलच्या खास टोप्या, उबदार कपडे, लाकडी कोरीवकामाच्या वस्तू अशी बाकी खरेदीही करता येते. येथेही राहण्यासाठी हॉटेल्सची चांगली व्यवस्था आहे. आसपासच्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी मिळतात. जेवण्याखाण्याची सोयही चांगली आहे. मात्र बरेच जण एखादाच मुक्काम कुल्लूला करतात आणि मनालीला पळतात.

Leave a Comment