टोकियो दि. १- जपानचा जगप्रसिद्ध माऊंट फुजीसान पुढील महिन्यात युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट होत असल्याचे वृत्त आहे. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॉन्युमेंटरी अँड साईट या यूएन सांस्कृतिक मंडळाने तशी शिफारस युनेस्कोला केली असून या युनेस्कोच्या जूनमध्ये कंबोडिया येथील बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल असे सांगण्यात येत आहे.
जपान सरकारने परिपूर्ण त्रिकोणी आकाराचा माऊंट फुजी हा जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ म्हणून अतिशय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जपानमधील हा सर्वात मोठा पर्वत सर्वाधिक उंचीचा असून त्याची उंची आहे १२४६० फूट. फुजिनोमिया शहराचे महापौर हिडेटाडा सुडो यांनी माऊंट फुजीला जागतिक वारसा स्थळात स्थान मिळाले तर त्यामुळे जपानमधील पर्यटनाला चालना मिळेल आणि शहर विकासासाठी त्याची मोठी मदत होईल असे मत व्यक्त केले आहे.
सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या पर्वताला जपानमध्ये फार महत्त्वाचे स्थान असून जपानसाठी तो धार्मिक वारसाही आहे. याच्या परिसरात पाच मोठी सरोवरे आहेत, एक सुंदर धबधबा आहे आणि आठ शिटो देवालयेही आहेत. डोक्यावर बर्फाची टोपी घातलेल्या फुजीसानची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध आहेत. वास्तविक हा एक ज्वालामुखी असून तो ३०० वर्षांपूर्वी भडकला होता. मात्र एखाद्या देवाप्रमाणे जपान्यांसाठी तो पवित्र असून जपानी सांस्कृतिक जीवनात त्याचे विशेष स्थान आहे.
युनेस्कोच्या जागातिक सांस्कृतिक वारसा स्थळात सिडने येथील ऑपेरा हाऊस, कंबोडियातील अंगोर देवालये, चीनची ग्रेट वॉल, तसेच इजिप्तच्या पिरॅमिडचा समावेश आहे.