पाण्यावर चालणारा मोबाईल चार्जर

स्वीडीश संशोधकांनी जगातला पहिला पाण्यावर चालणारा चार्जर तयार करण्यात यश मिळविले आहे. मायक्रो फ्यूएल सेल तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आल्याचे स्टॉकहोम येथील  केटीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधक अँडर्स लंडब्लाट यांनी सांगितले. एमवायएफसी पॉवर ट्रेक असे या चार्जरचे नामकरण करण्यात आले आहे. यामुळे साधे अथवा समुद्राचे पाणी वापरूनही चार्जरच्या सहाय्याने आयफोन पाच सारखे मोबाईलही पूर्णपणे चार्ज करता येतात. त्यामुळे इलेक्ट्रीसिटी नसलेल्या जगातील मोठ्या प्रदेशात मोबाईल सहज वापरणे शक्य होणार आहे. हा शोध मोबाईलच्या जगप्रसारासाठी वरदानच ठरणार आहे.

आजकाल हवामान अंदाजापासून ते इलेक्ट्रोनिक पेमेंटपर्यंत सर्व क्षेत्रात मोबाईलचा वापर वाढला आहे. अशावेळी वीज नसलेल्या ठिकाणीही मोबाईलचा वापर तितक्याच क्षमतेने करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. यात यूएसबी कनेक्टर कॉम्पॅक्ट पॉवर ट्रेक चार्जर उपकरणाला जोडला जातो. या चार्जरमधील मेटल डिस्कवर पाणी ओतले असता या युनिटमधील हैड्रोजन वायू मुक्त होतो आणि त्याचा ऑक्सिजनशी संयोग झाल्यानंतर रासायनिक उर्जेचे इलेक्ट्रीक उर्जेत रूपांतर होऊन मोबाईल चार्ज होतो.

सध्या हे उपकरण थोडे महाग असले तरी एकदा व्यावसायिक पातळीवर त्याचे उत्पादन सुरू झाले की त्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील असा संशोधकांचा दावा आहे. सोलर चार्जरपेक्षा हा चार्जर अधिक वेगवान आणि विश्वासार्ह आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. हे तंत्रज्ञान या संशोधकांनी चीन, जपान, यूएस आणि युकेतील कांही देशांना यापूर्वीच विकले असल्याचेही समजते.