दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता तपमानाचाही उच्चंाक

पुणे, दि. 30- ऐन दुष्काळात यावर्षी विक्रमी तपमानाचा तेरावा महिना आला आहे. आज पार्‍याने 41 अंशाचा सेल्सिअसचा टप्पा गाठला. रविवारीच पुण्याचे तापमान 40 अंशाच्या घरात पोहचले होते. त्यात वाढ होऊन आज संध्याकाळी पुण्यात 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर राज्यात सर्वात अधिक तापमान नागपूर येथे 45.4 अंश सेल्सिअस होते, अशी माहिती हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ मेधा खोले यांनी दिली आहे.
कोकण किनारपट्टी वगळता राज्यातील बहुतेक ठिकाणी पार्‍याने चाळिशी ओलांडली आहे. मराठवाडा, विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यात तापमान 40च्या घरात आहे. पुढील 24 तासांत उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेने व्यक्त केला.

पुण्यातही गेल्या तीन दिवसापासून पारा चाळीस अंशाच्या पुढे गेला आहे. तर शहर आणि परिसरात कमाल तापमान सरासरीएवढे होते. आज लोहगाव येथे 42.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली गेली. वायव्येकडून येणार्‍या उष्ण आणि कोरड्या वार्‍यांची तीव्रता वाढली आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे वाढलेले आर्द्रतेचे प्रमाणही एकदम कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यात वाढ झाली असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
पुणे 41.3, नगर 43.2, कोल्हापूर 40.3, सांगली 42.3, सातारा 42.2, सोलापूर 42.2, नाशिक 40.5, जळगाव 44.9, मुंबई 33, भिरा 43, औरंगाबाद 41.9, परभणी 43.6, नांदेड 43.5, अकोला 44.6,नागपूर 45.4, गोंदिया 42.1, वाशीम 42.2, वर्धा 43.3, यवतमाळ 43.

कोट
‘पंजाब आणि राजस्थान येथून उष्ण वारे महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे हवेतील आर्द्रताही कमी झाली आहे. त्यामुळे कमाल तापमान पुढील दोन दिवस 41 अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे‘ असेही डॉ खोले यांनी सांगितले.

Leave a Comment