बेनझीर हत्येप्रकरणात मुशर्रफना न्यायालयीन कोठडी

इस्लामाबाद दि.३० – पाकिस्तानचे माजी लष्करशहा आणि अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना आज म्हणजे मंगळवारी न्यायालयाने माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशीही मुशर्रफ यांना आपल्या घरातच बंदीवासात राहावे लागणार आहे.  रावळपिंडीतील दहशतवाद विरोधी न्यायालयाने मुशर्रफ यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुशर्रफ यांची पहिली न्यायालयीन कोठडीची मुदत ४ मे रोजी संपणार होती.

लंडन येथे आश्रय घेतलेले मुशर्रफ निवडणुका लढण्यासाठी पाकिस्तानात परतले ते देश वाचविण्याचे वचन देऊनच. मात्र येथे आल्यापासून त्यांच्यावर अनेक खटले सुरू झाले आहेत. २००९ सालची आणीबाणी, न्यायाधीशांचे निलंबन, २००७ ची बेनझीर यांची हत्या आणि बॉम्बस्फोट असे अनेक खटले त्यांच्यावर सुरू झाले आहेत. आणीबाणी खटल्यात त्यांना न्यायालयाने त्यांच्याच इस्लामाबादेतील फार्म हाऊसवर बंदी म्हणून ठेवले आहे. त्यात तालिबान्यांनीही मुशर्रफ यांची हत्या करण्याचे जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे बेनझीर यांच्या हत्येप्रकरणात अजूनपर्यंत कुणालाही अटक वा शिक्षा झालेली नाही. त्याच्या हत्येचा आरोप असलेला तालिबानचा प्रमुख बैतुल्ला मेहसूद हा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात यापूर्वीच २००९ मध्ये ठार झाला आहे. बेनझीर यांचा मुलगा बिलावल याने मात्र आईच्या हत्येसाठी मुशर्रफच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे तसेच या संबंधात यूएन ने सादर केलेल्या अहवालातही बेनझीर यांना पुरेसे संरक्षण असते तर हत्या टळू शकली असती असे सांगून त्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे मुशर्रफ यांच्यावरच टाकली आहे.

Leave a Comment