सरबजीतवरचा भ्याड हल्ला

पाकिस्तानातल्या लाहोर येथील कोट लखपत कारागृहात सुटकेची प्रतीक्षा करणारा भारतीय नागरिक सरबजीतसिंग याच्यावर तिथल्या कैद्यांनी हल्ला केला असल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. अफझल गुरूला फाशी दिल्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांनी तिथल्या कैद्यांना फूस दिली आणि सरबजीतवर हल्ला झाला. खरे तर सरबजीतची तुलना अफझल गुरूशी करण्याचे काही कारण नाही. पण तसे झाले आहे. पाकिस्तानने सरबजीतला दहशतवादी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ती शिक्षा योग्य नाही कारण तो दहशतवादी नाही असे आपले म्हणणे आहे पण तरीही तो दहशतवादी आहे असे पाकिस्तानचे म्हणणेच आहे तर त्यांनी त्या हिशेबानेसुद्धा त्याचे रक्षण करायला हवे होते. आपल्या सरकारने अजमल कसाबला कसे सांभाळले होते हे आपल्याला माहीत आहेच. पण सरकारला या कामात अपयश आले आहे. आता हे सरकार त्याला चांगले उपचार देईल याची काही खात्री नाही. तेव्हा त्याला आता भारतात पाठवले पाहिजे. इथेच त्याच्यावर यथायोग्य उपचार होतील.

त्याची त्याची आई आणि बहिण त्याची सटका व्हावी यासाठी जीवाचे रान करीत आहेत. त्यांना पाकिस्तानात काही प्रवेश मिळत नाही पण त्याच्यावर हा हल्ला झाला आणि नेमके याच वेळी त्याच्या कुटुंंबियांना पाकिस्तानात येण्याची परवानगी मिळाली. आता तो आपल्या आईला 23 वर्षांनी पहात आहे. तो 1990 साली भटकत पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. तिथे त्याला पकडण्यात आले आणि त्याच्या दुर्दैवाची कहाणी सुरू झाली, तेव्हापासून तो त्याच्या देशापासून आणि कुटुंबियांपासून दुरावला होता. तो पाकिस्तानात गेला आणि नेमके त्या नंतर सात आठ महिन्यात 1991 च्या पूर्वार्धात लाहोर येथे बाँबस्फोट झाले. त्यात अनेक पाकिस्तानी लोक मारले गेले. त्याचा आळ सरबजीतसिंग याच्यावर आला.

तो स्फोट तिथल्याच दहशतवादी कारवायांतून झाला होता पण तो भारताने घडवून आणला आहे असे कुभांड पाकिस्तानने रचले. त्या काळात भारतातून पाकिस्तानात तर दहशतवादी पाठवले जात नव्हतेच पण याह्याखान यांनी सुरू केलेली दहशतवादी कारवायांची मालिका सुरू होऊन पाकिस्तानचे दहशतवादीही म्हणावे तेवढे भारतात येत नव्हते. नंतर पाकिस्तानने भारतात अनेक घातपाती कारवाया पण भारताने उलट त्याला तशाच कारवायांनी कधीच उत्तर दिले नाही. भारताचा हा स्वभावच नाही. सारा इतिहास ज्यांना माहीत आहे त्यातला कोणीही भारताने लाहोरमध्ये बाँबस्फोट घडवले असतील या आरोपावर चुकूनही विश्‍वास ठेवणार नाही. पण पाकिस्तानने आपल्या देशातल्या कारवायांना स्वत:ला आवर घालता येत नाही हे आपले अपयश लपवण्यासाठी लाहोरच्या स्फोटांचा आरोप भारतावर लावला. नकळतपणे भरकटलेला सरबजीतसिंग त्यांना सापडलाच होता. त्यालाच पाकिस्तानच्या पोलिसांनी स्फोटाचा सूत्रधार ठरवले आणि त्याच्यावर खटला चालवून त्याला देहांताची सजा सुनावली. ती शिक्षा आणि नंतरचे सारे दया मागणीच्या अर्जाचे सोहळे तिथे अजूनही सुरू आहेत. त्याची चर्चाही रंगली आहे.

भारताप्रमाणे पाकिस्तानात दयेचे अर्ज प्रदीर्घकाळ प्रलंबित पडत नाहीत. पण तरीही भारत सरकारने उशिरा का होईना या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि सरबजीतची फाशी लांबणीवर पडली. गेल्या वर्षी तर सरबजीतला माफी देण्यात आली असल्याचे जाहीरही झाले. पाकिस्तान सरकारने तशी सूचनाही जाहीर केली. सरबजीतचे कुटुंबीय तो आता भारतात येणार म्हणून त्याच्या स्वागताला दिल्लीला गेले पण पाकिस्तान सरकारच्या नतद्रष्टपणाने शेवटच्या क्षणी त्यांच्या आनंदावर विरजण पडले. पाकिस्तान सरकार सोडणार असलेला कैदी सरबजीतसिंग नसून सूरजितसिंग आहे असे जाहीर करण्यात आले. सरबजितसिंग पुन्हा एकदा सुटकेची प्रतिक्षा करीत लाहोरच्या कारागृहात बसला. तो फाशीचा कैदी असल्यामुळे त्याला खास कोठडीत ठेवले आहे. त्याच्या कुटुंबियांना तो कधीना कधी सुटेल अशी आशा वाटते. आता हे लोक पाकिस्तानात निवडणुकीची घाई असतानाच्या काळातच गेले आहेत. काय होते ते परमेश्‍वरच जाणे. पण दरम्यान या कारागृहात त्याच्यावर काही कैद्यांनी हा प्राणघातक हल्ला केला आहे. खरे तर असा हल्ला होऊच शकत नाही कारण सरबजीतसिंग फार कमी वेळा कोठडीतून बाहेर पडत असतो. तो बाहेर पडतो तेव्हा त्याला खास पहार्‍यात आणलेले असते. मग त्याच्यावर हल्ला कसा होऊ शकतो. त्याचे पहारेकरी त्याच्यावरच्या हल्ल्याच्या कटात सहभागी असले पाहिजेत.

सरबजीतसिंग हा 21 वर्षांपासून तुरुंगात आहे. पण त्याच्यावर आताच हा हल्ला का झाला ? याचे कारण आहे अफझल गुरू. भारतातल्या संसदेवरच्या हल्ल्याच्या प्रकरणातला आरोपी अफझल गुरू याला फाशी देण्यात आल्याने पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटना चिडल्या आहेत आणि त्यांनी या फाशीचा बदला घेण्याचे ठरवले आहे. अर्थात हा बदला घेणार कसा ? भारत सरकार पाकिस्तानी दहशतवाद्याला फाशी देत असेल तर आम्हीही आमच्या ताब्यात असलेल्या भारतीय दहशतवाद्याला ठार करू असे त्यांचे म्हणणे आहे. पण भारताचा कोणी असा दहशतवादी त्यांच्या ताब्यात नाही. त्यांनी सरबजीत हा असा अतिरेकी असल्याचे मानले आहे. अफझल गुरुला फाशी दिल्यापासून त्यांनी त्याला ठार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातूनच या पाकिस्तानी दहशतवादी ंसंघटनांनी लाहोरच्या तुरुंगातल्या कैद्यांना फितवले आणि त्याच्यावर हल्ला करण्यातच देशभक्ती आहे असे त्यांना पढवले. अशा या गैरप्रचारातून त्याच्यावर कारागृहातच हल्ला करण्यात आला. खरे तर पाकिस्तान सरकारने त्याला संरक्षण द्यायला हवे होते. भारत सरकारने तसे त्या सरकारला बजावायला हवे होते पण आपला दुबळेपणा आडवा आला.

Leave a Comment