पवारांची लगबग, युतीत तगमग

दुष्काळ कितीही गंभीर असला तरीही निवडणुका जवळ आल्या आणि त्यांची चाहूल लागली की, राजकीय पक्षांना अंग झाडून कामाला लागावे लागतेच. दुष्काळी वातावरणाची कसलीही आचारसंहिता नसते. ती तारतम्याने तयार होते आणि तशीच सोयी सोयीने पाळली जात असते. दुष्काळावर सर्वाधिक काळजीने बोलणारे शरद पवार आता त्यांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यामुळे त्या दिशेने कामाला लागले आहेत. निवडणुका हा लोकशाहीतला एक अपरिहार्य भाग आहे हे नाकारता येत नाही. पण अजून ती बरीच लांब आहे. 2014 सालची लोकसभा निवडणूक किमान एक वर्ष तरी लांब आहे. पण तरीही राष्ट्रवादी काँग‘ेसने फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. काल पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीस सज्ज राहण्याचा आदेश दिला. त्यांची ही तयारी आता तरी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे. अजून तरी त्यांनी विधानसभेला हात घातलेला नाही. पवार या बैठकीत नेमके काय म्हणाले हे थेट कळलेले नाही पण त्यांनी नेत्यांना लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता गृहित धरून सर्वांना कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या म्हणजे 2009 च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना त्यांनी पराभवाच्या कारणांचा विचार करण्याचा सल्ला दिला असून या वेळची समीकरणे विचारात घेऊन काम करण्यास सांगितले आहे. पवार सध्या विजयी होऊ शकतील अशा उमेदवारांच्या शोधात आहेत असे दिसते. वरचेवर निवडणुका महागही होत आहेत आणि धंदेवाईक होत आहेत. अशा वेळी पवारांनी छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांना मैदानात उतरावेच लागेल असे स्पष्ट केले आहे. या दोघांनी गेल्या काही वर्षात करोडो रुपये कमावल्याचे आरोप होत आहेत. ते खरे की खोटे हा मुद्दा वेगळा पण या दोघांची निवडणूक लढवण्याची ताकद प्रचंड आहे हे नाकारता येत नाही. असेच 22 मातबर उमेदवार त्यांना शोधायचे आहेत. या निमित्ताने पवारांनी स्वबळाचा आवाज काढला नाही. म्हणजे ते काँग‘ेसशी हातमिळवणी करूनच निवडणूक लढवणार हे नक्की आहे. याबाबत त्यांची भूमिका योग्य आहे. नाही तर प्रत्येक वेळी ते स्वबळावर लढणार असल्याची आवई उठवतात आणि मग हळूच अधिक जागा पदरात पाडून घेऊन काँग‘ेसच्या सोेबतच निवडणूक लढवतात.

आता तसा काही सस्ता मार्ग त्यांनी अवलंबिला नाही. कारण राज्यातले लोकसभेचे जागावाटप राष्ट्रवादीसाठी अवघड आहे. जागावाटप करताना आता हातात असलेल्या जागा हा आधार मानायचा ठरवला तर वाटाघाटीत काँग‘ेसचा वरचष्मा असणार आहे. कारण आता काँग‘ेसच्या हातात 18 जागा आहेत आणि राष्ट्रवादीच्या हातात आहेत केवळ 9 जागा. गेल्या वेळी काँग‘ेसने 26 आणि राष्ट्रवादीने 22 जागा लढवल्या होत्या. आता आपल्याला 22 पेक्षा एकही जागा जादा मिळणार नाही हे पवारांना माहीत आहे. म्हणून फार राजकारण न करता त्यांनी 22 जागांचीच अपेक्षा धरली आहे आणि तेवढ्याच जागा लढवण्याची तयारीही केली आहे. खरे तर अशा राजकारणामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्‍चिततता राहते आणि तिचा परिणाम नाही म्हटले तरी निकालावर होत असतो. आता 22 जागांवर अधिक लक्ष केन्द्रित करण्याचे त्यांनी ठरवले आहे. आता आपल्या जागा वाढाव्यात असा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांनी त्या दृष्टीने शिवसेनेच्या जागांवर लक्ष केन्द्रित करण्याचे ठरवले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्‍चात शिवसेना फार प्रभावीपणे लढा देणार नाही आणि आता शिवसेनेचा राजकारणावरचा पगडा कमी होणार असा पवारांचा कयास आहे. तिकडे विरोधी आघाडीत अजून तरी म्हणावी तशी जाग आलेली नाही.

भाजपा आणि शिवसेना युतीत अद्याप तरी सामसूम आहे. युतीत आता भाजपा आणि शिवसेनेशिवाय रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आहे पण भाजपाच्या नेत्यांना ही आघाडी मनसेला सोबत घेऊन महाआघाडी करायची आहे. या मुद्यावरून आघाडीत वाद उफाळून येणार आहेत कारण, रामदास आठवले यांना राज ठाकरे नको आहेत. राज ठाकरे यांनी दोन तीन प्रश्‍नांच्या संदर्भात दलितांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याने आठवले यांनी आपण असेपर्यंत तरी मनसेला आघाडीत येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे. भाजपाचे नेते मनसेबाबत आग‘ही आहेत. कारण त्याचा आपल्याला फायदा होईल असे त्यांना वाटत आहे. आठवले यांना सोबत घेेतल्याचा जरासाही लाभ नगर पालिका आणि महानगर पालिकेत झालेला नाही. त्यामुळे आता आरपीआय च्या ऐवजी मनसेला सोबत घ्यावे किंवा दोघांनाही सोबत घ्यावे असा विचार भाजपा नेत्यांच्या मनात येऊ शकतो. असे अनेकांना सोबत घेणे सोपे आहे पण असे भागीदार वाढले की जागावाटपांत अनेक वाद व्हायला लागतात. त्यावर काय करणार ? 2009 साली ही युती अशी नव्हती. असती तर मागील निवडणुकीत पडलेल्या मतांच्या आधारावर आता जागा वाटत करणे सोपे गेले असते पण आता तशीही सोय नाही. युतीचे जागावाटपच अवघड होणार आहे.