युतीची चर्चा सर्वांसमोर व्हावी- उद्धव ठाकरे

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत असे सर्वसामान्य लोकांना वाटत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चाही सर्वांसमोर व्हायला हवी , अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. नुकतीच त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न मला सत्यात आणायचे असून मी त्यासाठी झटतो आहे. मी एकट्यानेच हो किंवा नाही अशा प्रकारचे उत्तर देणे योग्य ठरणार नाही. मी पहिल्यापासून सर्व गोष्टी पारदर्शी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही दोघांनी , अर्थात दोन पक्षांनी एकत्र यावे असे सामान्य लोकांना वाटत आहे. त्यामुळे हा प्रश्न जर सामान्य लोकांशी संबंधित असेल तर त्यांच्यापुढेच जाहीरपणे त्याविषयी बोलायला हवे. ‘

‘नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाला माझा विरोध नाही. मी हिंदुत्ववादी असून मला त्याचा गर्व आहे. नितीशकुमारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार धर्मनिरपेक्ष हवा आहे आणि मला हिंदुत्ववादी. त्यामुळेच यासंदर्भात एनडीएने त्वरित घटकपक्षांची बैठक बोलवावी आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा करावी एवढेच माझे म्हणणे आहे ‘, असेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment