मद्य आणि मांसाहारच गुन्हेगारीचे मूळ: स्वामी अग्निवेश

नवी दिल्ली: बलात्कारासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायद्याचा धाक पुरेसा नाही. लोकांनी मद्यप्राशन आणि मांसाहाराचा त्याग केल्यास बलात्कारांची संख्या कमी होईल; असा दावा समाजसेवक स्वामी अग्निवेश यांनी केला.

एकूण गुन्हे आणि अपघातांपैकी बहुतेक गुन्हे आणि अपघात हे मद्याच्या नशेत होतात; असा दावा करून अग्निवेश म्हणाले की; मद्यप्राशन कमी झाल्यास गुन्ह्यांचे प्रमाणही निश्चित कमी होईल. शाकाहाराचा पुरस्कार करताना अग्निवेश म्हणाले की; जपानमध्ये जगातील सर्वात दीर्घायुषी मानव शाकाहारी असल्याचे दिसून आले असून याबाबत जपानी अभ्यासक अधिक संशोधन करीत अहेत. मांसाहार हेच प्रत्येक व्याधीचे मूळ असल्याचा निष्कर्ष प्रत्येक संशोधनातून पुढे आल्याचा दावाही त्यांनी केला.

मद्याच्या धुंदीत माणसाची सदसदविवेक बुद्धी नष्ट होत असल्याचे निदर्शनास आणून देत अग्निवेश म्हणाले की; दिल्लीत धावत्या बसमध्ये युवतीवर निर्घृण सामूहिक बलात्कार करणारे सर्व आरोपी आणि ५ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारा आरोपी हे सर्व मद्याच्या अमलाखाली होते. मद्यानेच त्यांना हे दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त केले.

सध्याच्या काळात महसुली उत्पन्नाच्या लालसेने कोणतेही सरकार मद्योत्पादानावर निर्बंध घालू इच्छित नाही. उलट राज्या- राज्यांमध्ये अधिकाधिक मद्याचे करण्याची स्पर्धा सुरू आहे; अशी टीका करून अग्निवेश म्हणाले की; सध्याच्या काळात नैतिक आणि अध्यात्मिक मूल्यांचा र्‍हास होत आहे. कोणत्याही शाळेत ही मूल्य शिकवली जात नाहीत. त्यामुळे बलात्कारासारख्या वाढत्या गुन्ह्यांना व्यक्तिश: कोणी एक जबाबदार नाही तर संपूर्ण समाजच त्याला जबाबदार आहे.

बलात्कारासारख्या गुन्ह्यांना फाशीची तरतूद निरर्थक असल्याचे सांगून अग्निवेश यांनी फाशीच्या शिक्षेलाच विरोध केला. कोणालाच फाशी दिली जाऊ नये; अशी अपेक्षा करून ते म्हणाले की; मुंबईवर हल्ला करणारा कसाब अथवा संसदेवर हल्ला करणारे अतिरेकी यांनाही फाशी द्यायला नको होती; अशी आपली भूमिका आहे.

Leave a Comment