बंगळुरू- निवडणुक आयोगाच्या भरारी पथकाने प्रचारसभेसाठी आलेल्या बसपा अध्यक्षा मायावती यांची झडती घेतली असता त्याच्या पर्समध्ये एक लाख रुपयांची कॅश आढळली. त्यामुळे त्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. मी दलित असल्यामुळेच माझी अशाप्रकारे झडती घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी निवडणुक आयोगावर केला आहे.
सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गुलबर्गा येथे प्रचारसभेसाठी आलेल्या मायावती यांचा कर्नाटक दौरा वादात सापडला आहे. गुलबर्गातील जेवरगा येथे शनिवारी मायावती यांची सभा होती. त्यासाठी त्या पोहोचताच निवडणुक आयोगाच्या भरारी पथकाने त्यांच्याकडील सामानाची झडती घेतली. त्यात मायावती यांच्या बॅगमध्ये एक लाखाची नोटाची बंडले आढळली. या कॅशबाबत मायावती यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यातले ५० हजार रुपये आपले आहेत, तर बाकीचे ५० हजार कार्यकर्त्यांचे आहेत, असे सांगितले. त्यामुळे ही कॅश जप्त करण्यात आली नाही.
निवडणुकीची आचारसंहिता ज्या भागात लागू आहे तेथे जास्तीत जास्त ५० हजारांची रोकड आपल्यासोबत ठेवण्याची मुभा आहे. मायावती यांची त्यानंतरही पुन्हा एकदा झडती घेण्यात आली. आयोगाचे पथक त्यांच्या मागावरच होते.त्यांनी प्रचारसभेत या झडतीचा उल्लेख करत निवडणुक आयोगावर तोफ डागली. सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज प्रचारासाठी कर्नाटकात आल्या होत्या त्यांची झडती घेतली होती का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.