पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – मानवी जीवनाच्या केवळ प्रत्येक कालाखंडातच नाही तर संपूर्ण मानवी संस्कृतीच्या जडघडणीत पर्यावरणाची भूमिका महत्त्वाची होती आणि ती भविष्यातही राहणार आहे. मानव कितीही प्रगत झाला तरी त्याला पर्यावरणापुढे झुकावेच लागेल, असे मत ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. मधुकरराव ढवळीकर यांनी व्यक्त केले.
पर्यावरण जपणे हा जगण्यायेवढे महत्वाचे : पुरातज्ञ डॉ. मधुकरराव ढवळीकर
महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रंथालय संचालक आणि ग्रंथालय चळवळीतील अग्रणी कृष्ण मुकूंद उजळंबकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘कृष्ण मुकुंद पुरस्कार’ यंदा डॉ. ढवळीकर यांच्या ‘महाराष्ट्राची कूळकथा’ या ग्रंथाला देण्यात आला. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, मोहनशेठ गुजराथी, सुनील महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. ढवळीकर म्हणाले, ‘महाराष्ट्राची कूळकथा’ हे पुस्तक म्हणजे पुरातनकाळातील महाराष्ट्राच्या जडणघडणीचा खजिना आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, त्यावेळेचे मानवी जीवन कसे होते, त्यांची संस्कृती, घरे, कलाप्रकार अशा अनेक गोष्टींचा अभ्यास मला यानिमित्ताने करता आला. हे करत असताना पर्यावरणाने मानवी संस्कृतीवर केलेले परिणाम खूप ठळकपणाने जाणवले. आजही आपण पर्यावरणाच्या किंवा निसर्गाच्या हालचालींचा अंदाज लावू शकतो, पण त्या टाळणे आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळेच त्सुनामी, हिमवर्षाव, भूकंप, वणवे यासारख्या अनेक घडामोडी मानवी जीवनात हस्तक्षेप करताना दिसतात. त्यामुळेच पर्यावरणाचा विचार न करता प्रगती साधण्याचा आपला अट्टाहास अयोग्य आणि अनाठायी वाटतो.
