प्रत्येकाला कोणता न कोणता छंद असतो, आवड असतो. अनेकांनी लहानपणी पाहिलेली स्वप्नं असतात. मोठेपणी आपण कोण होणार याची प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या असते, महत्वाकांक्षा असते. अशाच सिनेमा निर्मितीच्या ध्येयाने प्रेरीत एका सिनेवेड्या तरूणाची कथा आगामी ‘तेंडल्या निघाला ऑस्करला’ मधून आपल्यासमोर येणार आहे. तेंडुलकर एन्टरटेनमेंट अॅण्ड मुव्हीज ने चित्रपट निर्मिती केलेली ही पहिलीच चित्रकृती येत्या ३ मेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपटांच्या वेगळ्या कथा, विषयाची आणि सादरीकरणाची परंपरा याही चित्रपटाने पुढे सुरू ठेवली आहे. ‘तेंडल्या निघाला ऑस्करला’चे वैशिष्ट्य़ म्हणजे यातील सर्वच कलाकार रूपेरी पडद्यावर पहिल्यंदाच येत आहेत. अभिनयाची आवड असलेले, आणि संधी अभावी आपली चमक दाखवू न शकलेल्या कलाकारांना आपली गुणवत्ता सिद्ध करू शकण्याची संधी ‘तेंडल्या निघाला ऑस्करला’ या चित्रपटाने दिली आहे.
भारतीय चित्रपटसॄष्टीच्या शताब्दी वर्षातला हा अभिनव प्रयत्न म्हणता येईल. सर्वस्वी नवीन कलाकार आणी तंत्रज्ञ यांना सोबत घेऊन केलेले हे धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे. चित्रपटाचे लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, नृत्यदिग्दर्शक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक हे सर्व तंत्रज्ञ यांचा हा पहिलाच चित्रपट असून नायक, नायिका, सहअभिनेते, खलनायक साकारणारे कलाकारसुद्धा पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या सर्व कलाकार तंत्रज्ञांची निवडही रीतसर ऑडीशनच्या माध्यमातून करण्यात आली. यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ऑडीशन्स घेण्यात आल्या. ऑडीशनमधून कलाकारांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांच्यासाठी अभिनयाची विशेष कार्यशाळा घेण्यात आली.
‘तेंडल्या निघाला ऑस्करला’ हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. याची कथा ‘चित्रपटातला चित्रपट’ या विषयावरची आहे. ग्रामीण भागामधे चित्रपट या माध्यमाचं असलेलं आकर्षण आणि या आकर्षण आणि फॅशनमधून होणारी चित्रपटाची निर्मिती असा धम्माल विषय या चित्रपटामधून बघायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सौ.अर्चना अश्विन तेंडुलकर यांची आहे. तर दिग्दर्शन डॉ.शशिकांत डोईफोडे यांचे आहे. चित्रपटात तेंडल्या च्या मुख्य भूमिकेत विनोद रेवाळे हा तरुण अभिनेता आहे तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिशा परदेशी आणि श्रद्धा सागांवकर या अभिनेत्री बघायला मिळतील इतर कलाकारांमध्ये देवेंद्र घावरे, सरोज राव, सुयशा गजानंद, सचिन बिडवई, राजेश चौधरी, निलेश कोंडे, गणॆश देशमुख, प्रशांत सातडेंकर, यशोधन मावळणकर आणि भटू चौधरी आदींच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात एकूण चार गाणी असून ती रचना सामंत आणि प्रा.रायभान दवंगे यांनी लिहिली आहेत तर संगीत पी.निखिल म्युझिक प्रोडक्शन, रसिक मेटांगळे, सागर सिधान, प्रशांत मग्गीडी यांचं आहे. चित्रपटाचं छायांकन नैनिश जाधव यांनी केलं आहे. येत्या ३ मे पासून तेंडल्याची ऑस्करवारी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.