एसटी मागचा टोलचा जाच संपुष्टात

मुंबई दि.२७ – प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज पण तोट्यामुळे डबघाईस आलेल्या एस.टी महामंडळाला राज्य शासनाने थोडासा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यापुढे एस.टी साठी टोल आकारला जाणार नाही असे वृत्त आहे. यामुळे महामंडळावरील किमान १०० कोटींचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे. टोलसंदर्भात नव्याने सादर होणार्या  टेंडरमध्ये एसटी टोलफ्री होईल असे समजते.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इंटक प्रणीत महाराष्ट्र एस.टी वर्कर्स असोसिएशनची शुक्रवारी बैठक झाली त्यात हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले. त्याचबरोबर कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचार्‍यांना किमान वेतन मे पासून दिले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. यामुळे एस.टीच्या ३० हजार कर्मचार्यां ना लाभ होणार असून त्यांचे वेतन ३ ते ५ हजारानी वाढणार आहे. मुख्यमंत्र्यांनी टोल आकारणी करणार्‍या कंपन्यांशी बोलणी केली असून काही कंपन्यांनी एसटी टोलफ्री करण्यास अनुकुलता दर्शविली आहे तर बाकी कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत असेही समजते.

Leave a Comment