लाहोर दि.२७ – पाकिस्तानच्या लाहोर तुरूंगात फाशीची शिक्षा सुनावला गेलेला भारतीय सरबजित सिंग याची प्रकृती गंभीर असून तो कोमात असल्याचे जिना हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने भारतीय अधिकार्यांना कळविले आहे. सरबजित सिंगवर कोट लखपत तुरूंगातच कांही कैद्यांनी विटा आणि चाकूने हल्ला केल्याने तो जखमी झाला होता. सुरवातीला त्याला तुरूंगाच्याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल गेले गेले होते मात्र तेथे त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला लाहोरच्या जिना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय दूतावासातील अधिकार्यांनी सरबजितला ठेवण्यात आलेल्या आयसीयूस भेट दिली असल्याचे समजते.
सरबजित या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर जखमा आहेत. मात्र तो कोमात असल्याने आत्ता कोणतीही शस्त्रक्रिया करता येत नसल्याचे तसेच त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांनी भारतीय दूतावासातील अधिकार्यांना कळविले आहे. १९९० साली पाकिस्तानात बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी सरबजितला अटक झाली होती आणि या गुन्ह्याबद्दल त्याला फाशी सुनावली गेली आहे. त्याचा दयेचा अर्ज तत्कालिन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी यापूर्वीच फेटाळला आहे.
सरबजितची अमृतसर येथे राहणारी बहिण दलबीर कौर हिने सरबजित गुन्हेगार नसून त्याला चुकीने पकडले गेल्याचे पुन्हा एकदा सांगितले. ती म्हणाली की आम्ही यापूर्वीच त्याच्या जिवाला तुरूंगात धोका असल्याचे वारंवार निवेदन दिले होते. आत्ताचा हल्ला हा पूर्वनियोजितच असून तो कटाचा एक भाग आहे. या तुरूंगाची क्षमता ४ हजार कैद्यांची असताना तेथे १७ हजार कैदी डांबले गेले आहेत.