नवी दिल्ली, दि.२७ -संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) काल लांबणीवर टाकण्यात आलेली बैठक २ किंवा ३ मे यादिवशी होण्याची शक्यता आहे. जेपीसीचे अध्यक्ष पी.सी.चाको यांनी आज लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांची भेट घेतली. त्यानंतर पुढील महिन्याच्या प्रारंभी जेपीसीची बैठक होऊ शकते, असे संकेत मिळाले.
जेपीसीची बैठक २ किंवा ३ मे रोजी ?
चाको यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी जेपीसीमधील विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मीराकुमार यांच्याकडे केली आहे. यापार्श्वंभूमीवर, चाको यांनी मीराकुमार यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली बाजू मांडली. अर्थात, मीराकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील पत्रकारांना सांगण्यास त्यांनी नकार दर्शवला.
राजकीय वादळ निर्माण करणार्याल टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी जेपीसीकडे सोपवण्यात आली. या चौकशीच्या अहवालाचा मसुदा काही दिवसांपूर्वीच जेपीसीच्या सदस्यांमध्ये वितरीत करण्यात आला. त्यात पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम् यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. जेपीसी अहवालाचा हा मसुदा फुटल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. हा जेपीसीचा नव्हे तर काँग्रेसचा अहवाल असल्याची खिल्ली विरोधकांकडून उडवण्यात येत आहे.
अशातच चौकशी अहवालाच्या मसुद्यावर विचार करण्यासाठी काल जेपीसीची बैठक बोलावण्यात आली. मात्र, ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जेपीसीमध्येच संघर्ष चिघळला आहे. जेपीसीच्या ३० पैकी निम्म्या सदस्यांनी चाको यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी मीराकुमार यांच्याकडे केली. काँग्रेस नेते चाको यांच्यावर जेपीसीच्या १५ सदस्यांनी अविश्वाास दर्शवला आहे. दरम्यान, चौकशी अहवालाचा मसुदा मंजूर करण्यासाठी २ किंवा 3 मे यादिवशी जेपीसीची बैठक होण्याची शक्यता आहे. जेपीसीचा कार्यकाळ १० मे ला समाप्त होणार आहे. त्यापूर्वी जेपीसीचा अहवाल संसदेत मांडला जाईल, असे समजते.