पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) ‘मराठी चित्रपट हा आपल्या सांस्कृतिक आयुष्याचा एक भाग आहे. कोणताही मराठी चित्रपट आपण पाहिला, तरी त्यामध्ये आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी मिळतात. एकाचवेळी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मराठी चित्रपटांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. असे मत संगीतकार कौशल इनामदार यांनी शनिवारी व्यक्त केले.
चित्रपट महोत्सव म्हणजे कलाजीवनाची पंढरी: कोशल इनामदार
मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने आयोजित पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीयत्व चित्रपट संग्रहालय येथे झाले. यावेळी दिग्दर्शक सतीश मन्वर व अभिनेत्री विभावरी देशपांडे उपस्थित होत्या.
इनामदार म्हणाले, मराठी चित्रपटाच्या माध्यामातून मराठी भाषा, संस्कृती व समाज जीवनाचे चित्र समाजासमोर उलगडत असते. त्यामुळे प्रत्येकाने मराठी चित्रपटांकडे केवळ मनोरंजन नव्हे, तर एक चळवळ म्हणून पाहण्याची गरज आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहामध्ये योग्य पद्धतीने खेळ ठेवले जात नाहीत. त्यामुळे अशा महोत्सवांची नितांत गरज आहे.
मन्वर म्हणाले, परदेशात सर्व धाटणीचे चित्रपट विविध महोत्सवांद्वारे प्रेक्षकांना पाहण्यास मिळतात. त्यामुळे आपल्याकडे अशा मराठी चित्रपट महोत्सवांची खूप गरज आहे. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा दुष्काळ अशा महोत्सवांमुळे दूर होईल. समीक्षकही प्रशिक्षित असल्यास चांगले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील असा आशावाद मन्वर यानी व्यक्त केला.
देशपांडे म्हणाल्या, नाट्य व साहित्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्या तुलनेत अन्य भाषांमध्ये मनोरंजनाला मर्यादा आहेत.त्यामुळे मराठी चित्रपट तिकीट काढून पाहण्यासाठी जाणार्या प्रेक्षकांची संख्या मर्यादित आहे. प्रेक्षक व कलाकारांची मानसिकता बदलण्याची आवश्यता आहे.