कृषी आणीबाणी जाहीर करा

dushkal6
देशातली कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली की, आणीबाणी पुकारली जाते. युद्ध सुरू झाल्यावर अशीच आणीबाणीची घोषणा केली जाते. पण देशाची आर्थिक स्थिती बिघडली तर तेवढ्यापुरती म्हणजे आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची मागणी पुढे येते. तशी तरतूद आपल्या घटनेत आहे की नाही हे कधी चर्चिले गेलेले नाही पण तशी मागणी होत असते हे मात्र खरे आहे. आता महाराष्ट्रातली पाण्याची आणि शेतीची स्थिती इतकी वाईट झाली आहे की, राज्यापुरती कृषि आणीबाणी जाहीर करण्याची मागणी होऊ शकते. दुष्काळाचे संकट फार गंभीर आहे असे म्हटले जाते पण ते खरेच किती गंभीर आहे याची तीव‘ता फार कमी लोकांना कळली असेल. राज्यात केवळ शेतीवर गुजराण करणार्‍या शेतकर्‍यांची सर्व प्रकारची देणी माफ करून त्यांना पुन्हा एकदा नवे जीवन सुरू करण्याची संधी दिली पाहिजे अशी अवस्था आली आहे. येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाला सरकारने राज्यातला कोणताही शेतकरी आता कोणाचाही एक छदामही देऊ लागत नाही असे सरकारने जाहीर करायला हवे आहे कारण या वर्षी केवळ दुष्काळच पडला आहे असे नाही तर वर्षभरात तीन चार वेळाया शेतकर्‍यांना अवेळी पावसाचे आणि अन्य नैसर्गिक आपत्तीचे फटके बसलेले आहेत. आता त्यांना नवे जीवन जगण्याची संधी दिली नाही तर या राज्यातला शेती व्यवसाय गंभीर संकटात सापडल्या खेरीज राहणार नाही.

दुष्काळाने गांजलेल्या शेतकर्‍याला अनावश्यक पण अपरिहार्य संकटाला तोंड द्यावे लागले की, दुष्काळात तेरावा महिना आला, असे म्हटले जातेे. यंदाचा दुष्काळ किती जीवघेणा आहे याची कल्पना शहरातल्या लोकांना कदाचित येणार नाही पण या दुष्काळात प्रत्येक महिना धोंड्याचा म्हणजे अधिकचा येत आहे. नापिकी झाली आहे हे तर खरेच पण काही लोकांनी घामाची शिंपण करून त्यातल्या त्यात नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न केलाय. अशा लोकांनी खरेच अपवादात्मक अशा कष्टाने जे काही पिकवले आहे ते हा दुष्काळ त्यांच्याही पदरात नीट पडू देत नाही. अशा प्रकारची संकटे या वर्षीच्या दुष्काळात सातत्याने येत आहेत. दुष्काळात तेरावा महिना असे वैतागून म्हणावे असे प्रसंग वांरवार येत आहेत. खरेच काही वेळा हा पाऊस शेतकर्‍यांना दुस्मानासारखा वाटायला लागतो. तो इतक्या विपरीतपणे पडतो की त्याने यंदा शेतकर्‍यांना पुरते झोपवायचेच ठरवले आहे की काय असे वाटावे.

यंदा कशीबशी रबीची पिके आली होती आणि त्यांच्या जोरावर निदान सोसायटीचे व्याज तरी फेडायला येईल अशी मनोराज्ये शेतकरी रचायला लागला होता. या पिकांच्या वाढीच्या क काळात चुकूनही पडला नाही. पण खळे दळे करून बाजारात माल नेताना दोन तीनदा अक्षरश: तो विघ्नासारखा आला. काही लोकांची खळीदळी लांबली होती. त्यांना पाडव्याच्या सुमारास येऊन दणका देऊन गेला. खरेच शेतकर्‍यांच्या नशिबाची थट्टा म्हणजे काय हे आता अनुभवायला मिळत आहे. जनावरे जगवणे कठीण झालेय, पिण्याचे पाणी मिळत नाही. दरवर्षी येणारी बागायती पिकेही म्हणावी तशी येत नाहीत. जनावरांना गुरांच्या छावणीत ठेवावे लागत आहे. आणि हा दुस्मान वेळोवेळी फटके मारत आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यात त्याने हैदोस घातला. यावेळी रानात पिकेही नाहीत आणि खळेही नाहीत पण, आता लक्ष्मीचे तोंड दाखवणारे आंबे आणि केळी आहेत. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तर केळीने पहिला नंबर मिळवलेला आहे. केळी म्हटले की जळगावचे नाव ओठावर येणारच पण आता जळगाव मागे पडायला लागले आहे आणि नांदेड, सोलापूर तसेच हिंगोली ही नावे पुढे यायला लागली आहेत. या जिल्ह्यातले केळी उत्पादक आता आता थोडे पैसे कमवायला लागले होते पण सलग दुसर्‍या वर्षी केळी वादळात आणि अकाली पावसात नष्ट झाली. अनेक ठिकाणी ती लागलेल्या धडांसह कोसळली. मोठ्या कष्टाने दहा महिने लहान पोरासारखी जोपासलेली केळी अशी जमीनदोस्त झालेली पाहताना शेतकर्‍यांच्याच काय कोणाही सहृदय व्यक्तीच्या काळजाचे पाणी झाल्याशिवाय रहायचे नाही. इतकी ही बरबादी भीषण आहे.

ती सगळी संकटे संपल्यावर आलेली, सगळे काही उद्ध्वस्त झाल्यानंतरची हानी आहे. सगळ्याच स्वप्नांचा चुराडा करणारी. आता आता मराठावाड्याचे नाव केसर आंब्यामुळे प्रकाशात यायला लागले होते. मागासलेल्या मराठवाड्याने कोकणातल्या हापूस आंब्याची बरोबरी करीत परदेशी निर्यात केली आणि देशाला परदेशी चलन मिळवून दिले. यंदा बरा आला होता. नशिबाने सारे लुटून नेले तरी हा आंबा तरी आपल्याला भीक मागायला लावणार नाही असे वाटले होते. पण त्याच्यावरही घाला पडला. किती मुलींचे हात पिवळे होण्याचे टळले असेल आणि कितिकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले असेल याची काही मोजदाद नाही. पाऊस पडलाच नाही तर येणारे उत्पन्न बुडते. पदरचा खर्च झालेला नसतो. पण पदरचा खर्च करून पीक आणायचे आणि मग केलेल्या खर्चासह उभे पीक अशा फटक्याने धुवून जायचे हे नुकसान जास्त असते कारण खर्च झालेला असतो. खरोखरच सरकारने शेती आणीबाणी घोषित केली पाहिजे.

Leave a Comment