मुंबई, दि.२४- आधार कार्ड योजना जेव्हापासून सुरू झाली, तेव्हापासूनच ती वेगवेगळ्या ग्रहणांमध्ये अडकल्यासारखी आहे. याच्या मार्गातील अडथळे अजून दूर झालेले नाहीत. याआधी अनेक आधार कार्डांवर जन्मतारखेचा उल्लेख नसल्याची बाब उघड झाली. आता चक्क तीन लाख नागरिकांची माहिती करप्ट झाल्याचे उघडकीस आले आहे. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने अपलोड केलेला सर्व डाटा करप्ट झाला आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार गोळा केलेली सर्व माहिती मुंबईच्या सर्व्हरमधून बंगलोरच्या सर्व्हरमध्ये पाठवण्यात येते. या ट्रान्समिशनदरम्यान हार्डडिस्क क्रॅश झाल्याने ही सर्व माहिती करप्ट झाली आहे. यातील बहुतेक माहिती मुंबईच्या रहिवाशांची होती. या सर्व घोळामुळे इच्छुकांना पुन्हा अर्ज भरावे लागणार असून, त्यासाठी सर्व खटाटोप पुन्हा एकदा करावा लागणार आहे. याआधी केवळ दहा पंधरा दिवसांपूर्वीच एमपीएससीचा डाटा करप्ट झाल्याने साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. आता या नागरिकांनी पुन्हा आपली माहिती भरल्यानंतरच त्यांना आधार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.