मुक्त अर्थव्यवस्थेने आपल्याला दोन देणग्या दिल्या आहेत. पहिली म्हणजे मूल्यांचा र्हास आणि दुसरी म्हणजे उपभोक्तावाद. या दोन गोष्टींनी उत्पादन वाढते आणि पैशाची किंमत वेगाने कमी होत जाते. आजच्या एक रुपयाची किंमत येत्या वर्षभरात 75 पैसे होण्याची शक्यता असते. म्हणून ज्याच्या हातात काही गुंतवणूक करण्यासारखा पैसा आहे तो त पैसे चांगला मोबदला देणार्या योजनेत गुंतवण्याचा प्रयत्न करीत असतो कारण तसा तो मिळाला तरच त्याच्या संपत्तीची क‘य शक्ती कायम राहणार असते. म्हणून अनेकदा फसवणूक झाली असतानाही अनेक लोक जादा व्याजदाराच्या आमिषाला वारंवार बळी पडत असतात. लोकांचा असा पैसा जमा करून शेअर बाजारात गुंतवला तर त्यातून त्यापेक्ष़ाही अधिक मोबदला मिळवता येईल अशी आशा या प्रकारच्या गुंतवणूकदार कंपन्यांनाही असते. मुक्त अर्थव्यवस्थेत या सार्या गोष्टी अपरिहार्य आहेत. असा जादा मोबदल्याचा कोणत्याही प्रकाराचा हव्यास महागात पडत असतो हे अनेकांना माहीत असते तरीही ते पुन्हा त्या जाळ्यात अडकतात. एखाद्या गुंतवणुकीच्या योजनेत जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडून पैसा गुंतवला की शेवटी ते जादा व्याज इतके महाग पडते की सारी गुंतवणूकच गमावून बसावे लागते. असा अनुभव नेहमीच येतो. एखाद्या शहरात रात्रीतून एखादी कंपनी उगवते आणि लोकांच्या ठेवी गोळा करून पळून जाते. लोकांना आकर्षक व्याजाची एवढी भुरळ पडलेली असते की, त्या मोहात त्यांनी त्या कंपनीचा पत्ताही नीट विचारलेला नसतो. तो कंपनीवाला गावातून पळाला की सगळेच कपाळाला हात लावून बसतात.
खाजगी वित्तीय संस्थांचा धोका
ठेवी संकलित होेताना फारसा त्रास होत नाही कारण बँकांत 10 ते 11 टक्के व्याज असताना या कंपनीचा व्याजदर 16 ते 20 टक्के असते. मग जादा व्याजाच्या आशेने अनेक आपल्या ठेवी ठेवतात. पळालेल्या कंपनीचा पत्ता तामिळनाडूमध्ये कोठे तरी असतो आणि तिथे आपण जाऊ शकत नाही. अशा बातम्या अनेक वृत्तपत्रांत छापून येतात पण तरीही लोक शहाणे होत नाहीत. पुन्हा सहा सात महिन्यांनी असाच प्रकार पण दुसर्या गावात घडतो. अशा कंपन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या ज्या गावातल्या लोकांना लुटतात ते गाव ज्या राज्यात असतेे त्या राज्यातले ते नसतात. त्यांचे एजंटांचे जाळे पसरवण्याची पद्धतही फार शिस्तबद्ध असते. ते स्वत: कोणाच्याही समोर येत नाहीत. गावातल्याच एजंटांनी लोकांना पैसे मागितलेले असतात. लोक फसतात आणि आपल्या गावातले हे एजंटही फसलेले आहेत हे त्यांना कळते. अनेक लोक आपली जन्माची कमायी त्यांच्यात गुंतवतात आणि या कंपन्यांनी फसवले की जन्मभर त्यांच्या नावाने बोटे मोडत बसतात. कोलकत्ता येथील शारदा चिट फंडाचे प्रकरण उद्भवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या संस्थेत गुंतवणूक करणारांना त्यांच्या ठेवींवरचे व्याज मिळाले नाही म्हणून ते पं. बंगालच्या अनेक शहरांत निदर्शने करीत आहेत. या संस्थेशी सत्तारूढ तृणमूल काँग‘ेसच्या काही नेत्यांचे संबंध असल्यामुळे या प‘करणाला राजकीयही स्वरूप आले आहे. पण शेवटी राज्य सरकारने या असंतोषाची दख़ल घेतली आणि पोलिसांना या संस्थेची पाळेमुळे खोदून काढण्याचा आदेश दिला. या संस्थेचा अध्यक्ष सुदीप्तो सेन याला काल जम्मू काश्मीर मध्ये अटकही करण्यात आली. 1980 च्या दशकात कोलकत्त्याच्याच संचयनी या संस्थेचे प्रकरण असेच गाजले होते. त्या संस्थेने प्रचंड जाहीराती करून लोकांना मोहून टाकले होते आणि देशभर आपले जाळे विणले होते. त्या संस्थेनेही आपला कारभार किती मोठा आहे याचा बराच गवगवा करून लोकांना अक्षरश: भारून टाकले होते. अनेकांनी आपली जन्माची कमायी या संस्थेच्या विविध योजनांत गुंतवली होती आणि वृद्धापकाळाचा आधार गमावला होता. फसलेल्या अनेक लोकांनी तर आत्महत्या केल्याच पण कंपनीच्या अनेक एजंटांनीही आपले जीवन गमावले होते कारण या एजंटांनाही आपली ही कंपनी बुडणार आहे याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी लोकांना आपले पैसे गुंतवण्यासाठी भरीला पाडले होते.
अशा रितीने बुडलेले गुंतवणूकदार त्यांच्या मागे लागले तेव्हा या एजंटांनाही जगणे मुष्कील झाले होते. तिने 120 कोटी रुपये जमा केले होते आणि पैसे गोळा करताना दिलेली मोठ्या परतफेडीची आश्वासने केवळ काही लोकांच्याच बाबतीत पूर्ण केले होते. कंपनीने दिवाळे काढले आणि कंपनीचा प्रवर्तक शंभू मुखर्जी यानेही आत्महत्या केली होती. कंपनीच्या विरोधात दाखल झालेला खटला अजूनही चालू आहे. अशा प्रकारांत पैसे गुंतवताना कंपन्या नाना प्रकारची आश्वासने देतात आणि कंपनीने फसवणूक केल्यास न्यायालयात दाद मागता येेईल असा दिलासा देतात पण न्यायालयात जाण्याने गुंतवणूक दारांना न्याय मिळत नाही. अशा कंपन्या गावागावांत असतात आणि त्यातल्या अनेक कंपन्यांत लोकांची लुबाडणूक होत असते. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे जादा व्याजदराचे आमिष. आपल्या देशात फार कमी लोकांना वृद्धापकाळात स्वाभीमानाने जगण्याचा निवृत्त वेतन नावाचा मार्ग उपलब्ध असतो. बाकीच्या लोकांना आपल्या निवृत्तीनंतरच्या पुंजीवर अधिक मोबदला मिळावा असे वाटत असते. त्याचा गैरफायदा या कंपन्या घेतात. लोक फसत राहतात.
