ड्रॅगनचे विषारी दात

भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेली सीमा रेषा संदिग्ध आहे. मात्र त्याचा फायदा घेऊन चीनने भारताला युद्धसज्ज तळांनी पूर्णपणे वेढून टाकले आहे. भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान आहे. तो तर चीनच्या बाजूनेच आहे. उत्तरेला अक्साई चीनचा प्रदेश गिळून आणि तिबेटला आपल्या पोटात घेऊन चीनने भारताच्या हद्दीला आपल्या हद्दी भिडवल्या आहेत. आता जम्मू-काश्मीरच्या पूर्व भागातील काही प्रदेशावर हळू हळू आक्रमणे सुरू केली आहेत. १९६२ साली या दोन देशात युद्ध झाले होते. त्यानंतर त्यांच्यात युद्ध झाले नाही, परंतु युद्धापेक्षाही वाईट असा तणाव निर्माण करणारी लहान-लहान घुसखोरी चीनकडून सतत केली जात आहे.

परंपरेने भारताच्या ताब्यात असलेला परंतु भारताने उपयोग न केलेला ४० हजार कि.मी. इतका भूभाग ज्याला अक्साई चीन असे म्हटले जात होते तो चीनने ताब्यात घेतला होताच. शिवाय भारताच्या उत्तरेला लडाख हा भाग आहे आणि हा भाग भारत, चीन आणि पाकिस्तान या तीन देशांच्या सीमेवर येतो. या भागातील काही वादग्रस्त प्रदेश पाकिस्तानने चीनला देऊन टाकला. हा प्रकार उघडपणे केला असता तर भारताने त्याला चोख उत्तर दिले असते हे पाकिस्तानला माहीत होते. त्यामुळे पाकिस्तानने एक चलाखी केली. तो प्रदेश आपल्यातर्फे चीनला देऊन टाकला. तो चीनने ताब्यात घेतला. भारताला काहीही करता आले नाही.

आता या प्रदेशातून चीन आणि पाकिस्तान यांना जोडणारे रस्ते तयार करण्यात आले आहेत आणि या प्रदेशात चीनने जय्यत युद्ध तयारी केली आहे. भारत आणि तिबेटच्या सीमेवर चीन मजबूत आहे. अलिकडेच भारत सरकारने भारत-तिबेट सीमेवर एक विशेष आक्रमक दल तयार केलेले आहे. परंतु जम्मू-काश्मीरला लगत असलेल्या भारतीय सीमेवर तसेच सिक्कीम जवळच्या सरहद्दीवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. आता जम्मू-काश्मीरच्या दोन भागांमध्ये चीनने घुसखोरी केलेली आहे. दौलत बेट ओल्डी या ठाण्याजवळ चीनच्या जवानांनी १० कि.मी. आत येऊन तंबू ठोकले आहेत. यातंबूचे प्रकरण गाजत असतानाच चीनच्या हेलिकॉप्टरनी दौलत बेट ओल्डीच्या दक्षिणेस असलेल्या क्युमार भागामध्ये ३०० कि.मी. आतपर्यंत हेलिकॉप्टरच्या साह्याने घुसखोरी केली आहे.

एकंदरीत चीन बराच आक्रमक झालेला आहे आणि भारत सरकार मात्र त्याला चोख उत्तर देण्याच्या ऐवजी सुरक्षात्मक उपाय योजून चीनशी चर्चा करण्याची तयारी दाखवत आहे. चीनला या भागामध्ये घुसखोरी करून भारताला वेढायचेच आहे. त्यामुळे चीनने चर्चा आणि बैठकीचे आवाहन फेटाळून लावले आहे. भारत काहीच करू शकत नाही. भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी आपला देश आपल्या सीमांचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे खरे, परंतु चीनच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची भारताची तयारी नाही. कारण चीनची लष्करी ताकद जास्त आहे.

भारत आणि चीन यांच्या दरम्यान उत्तरेपासून ईशान्येपर्यंत ४००० कि.मी. लांबीची सरहद्द आहे. ही सरहद्द प्रामुख्याने हिमालयाच्या पर्वतराजीतून आणि लहान-मोठ्या पाण्याच्या ओहळातून गेलेली असल्यामुळे ती निश्चित करता येत नाही. त्यामुळे चीनची सरहद्द नेमकी कोठून सुरू होते आणि भारताची हद्द कोठून सुरू होते याविषयी सतत संभ्रम असतो. हा संभ्रम कमी व्हावा म्हणून प्रत्यक्ष ताबा रेषा ठरविण्यात आलेली आहे. असे असूनही चीन सातत्याने संभ्रमाचा उपयोग करून भारतीय हद्दीमध्ये इंचइंच आणि फुटाफुटाने हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत असतो. चीनच्या या आक्रमक हालचाली भारतासाठी मोठ्या अस्वस्थता निर्माण करणारया असतात.

आपल्याला असे लक्षात येईल की, हद्दीविषयीच्या संभ्रमाचा फायदा घेऊन चीनच भारताच्या हद्दीत घुसखोरी करत असतो. त्याउलट भारतीय सैनिकांनी चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे एकही प्रकरण कधी आढळत नाही. मग संभ्रमाचा फायदा चीनच का घेतो, या प्रश्नाचे उत्तर या चीनच्या सहानुभूतीदारांना देता येणार नाही. चीनच्या अशा छोट्या मोठ्या कुरापतींकडे भारत सरकार सुद्धा फारशा गांभीर्याने पहात नव्हते. त्यामुळे भारतातील चीन मित्रांची चीन कधी आक्रमण करतच नसतो, असे म्हणण्यापर्यंत मजल जाते. खरे म्हणजे प्रत्यक्ष ताबा रेषा निश्चित झालेली आहे. परंतु चिनी सैनिक ताबा रेषेच्या आत सिगारेटची पाकिटे टाकतात, कधी कधी चीनमधील खाद्य पेयांचे डबे टाकतात आणि कालांतराने तो भाग आपलाच आहे असा दावा करतात.

सिक्कीममध्ये असाच प्रकार घडला होता. एके रात्री चिनी सैनिकांनी घुसखोरी करून चुन्याने रंगवलेल्या दगडांच्या रांगा भारतीय हद्दीत लावल्या. त्यावर भारत सरकारने हरकत घेतली. मग त्या रांगा हटवण्यात आल्या. परंतु सहा महिन्यांनंतर चिनी सैनिकांनी त्या रांगा जिथे लावल्या होत्या तो प्रदेश आपलाच होता, परंतु भारताने तो नंतर हडपला असा आरोप लावायला सुरुवात केली. असाच प्रकार लडाखमध्ये घडणार आहे. दहा कि.मी. आत येऊन तंबू ठोकले आहेत. भारताने त्याला हरकत घेतली आहे आणि दोन देशांच्या लष्करी अधिकार्यांयची बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे. परंतु चीनच्या लष्कर प्रमुखांनी वरकरणी अशा बैठकीला मान्यता दिली. प्रत्यक्षात मात्र बरेच अधिकारी रजेवर आहेत असे सांगून बैठक लांबवली. असे काही दिवस निघून गेले की, तिथे बरेच दिवस त्या तंबूंचा असा मुक्काम राहतो. बैठक झाली की ते तंबू हटवले जातात. परंतु तंबू असण्याच्या काळात चिनी सैनिकांनी तिथे काही दगड रोवलेले असतात आणि भविष्यात त्या जागेवर दावा करण्याची व्यवस्था केलेली असते.

Leave a Comment