जैव इंधनावर चिनी विमानाची यशस्वी भरारी

बिजिग दि.२५ – देशातील नंबर एकची समजली जाणारी ऑईल रिफानरी कंपनी सिनॉपे ने पाम तेल आणि स्वयंपाकाचे वापरले गेलेले तेल रिसायकल करून त्या दोन्ही तेलांच्या मिश्रणातून बनविलेल्या जैव इंधनावर विमान चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामुळे आता विमानासाठी जैव इंधन वापरणार्याा पहिल्या चार देशांत चीनला स्थान मिळाले आहे. अमेरिका, फ्रान्स, फिनलंड नंतर आता चीनने विमानात जैव इंधन वापरण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

कंपनीने बनविलेल्या या जैव इंधनावर चायना इस्टर्न एअरलाईन्सच्या एअरबस अे-३२० या विमानाने शांघाय आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी लँडींग केले ते ८५ मिनिटांचा प्रवास करून. कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या इंधनातूनही विमानाच्या पारंपारिक इंधनाइतकीच उर्जा मिळाली आणि त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला. आता या इंधनाचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन करण्यासाठीच्या योजनेला गती देण्यात येणार आहे.