नक्षलवादी पुण्यात

पुण्यातली मध्यमवर्गीय कुटुंबातली सात मुले नक्षलवादी तत्वज्ञानाकडे आकृष्ट होऊन गडचिरोलीच्या जंगलात गेली असल्याचे आढळून आले आहे. पकडण्यात  आलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्या चौकशीत दिलेल्या माहितीवरून ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कबीर कला मंच या संस्थेच्या माध्यमातून कलेतून समाज जागृती करणारी ही मुले हातात बंदुका घेऊन समाजाचा  हिंसक पध्दतीने बदला घेण्यास कधी आणि कशी तयार झाली याबद्दल सर्वांना सखेद आश्चर्य वाटत आहे. कारण हा समाजातल्या एका विशिष्ट विचारांचा प्रवाह आहे आणि हा प्रवाह आपल्या समाजाच्या भवितव्यावर धोक्याचा लाल बावटा दाखवत आहे. सावध होण्याची ही वेळ आहे. 

नक्षलवादी कार्यकर्ती म्हणून ख्यातनाम असलेल्या अॅंजेला नावाच्या तरुणीच्या संपर्कात येऊन ही मुले बिघडली. त्यांचा सुगावा लागल्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर फिरायला लागले मात्र हे लोक जंगलांमध्ये वास्तव्याला राहिले होते. त्यामुळे ते सापडले नाहीत. परिणामी त्यांना संशयास्पद नक्षलवादी म्हणून जाहीर करण्यात आले. पोलीस मागे लागल्यानंतर  पुण्यातल्या या तरुण-तरुणींना जंगलातील आदिवासींप्रमाणे पोलिसांची नजर चुकवून रानावनात फिरणे अशक्य व्हायला लागले. परिणामी त्यांनी शरणागती स्वीकारायचे ठरवले.

कबीर कलामंचातील सचिन माळी आणि शीतल साठे या दोघांनी चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शरणागती स्वीकारली. पण ती स्वीकारताना मोठेच नाटक केले. आपल्याला खूप पश्चात्ताप झालेला आहे आणि नक्षलवाद्यांशी आपले वैचारिक मतभेदसुध्दा निर्माण झालेले आहेत असे म्हणून आपण आता त्या मार्गाने जाणार नाही असे म्हणत त्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केले. असे असले तरी प्रसिध्दीचे झोप आपल्यावरच पडतील अशी व्यवस्था त्यांनी केली होती. त्यांनी मुंबईत विधानभवनासमोर जाहीरपणे शरणागती स्वीकारली. तेव्हा त्यांच्या या शरणागतीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातल्या डाव्या चळवळीतले अनेक नेते हजर होते. त्यांनी माळी आणि साठे यांच्या शरणागतीचे स्वागत केले. एकंदरीत देशातल्या एका हिंसक चळवळीमध्ये बिनडोकपणे सहभागी झालेले हे लोक शरण येत असताना त्यांचा धिक्कार करण्याऐवजी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सार्यान डाव्या नेत्यांनी केला.

ही मंडळी तोंडाने गांधीजींचे आणि अहिंसक चळवळीचे नाव घेत असली तरी त्यांना आतून नक्षलवाद्यांसारखा हिंसक चळवळीच्या बाबतीत सहानुभूतीच वाटत असते, हे या प्रकारावरून दिसून आले. त्यांची खास पोलिसी पध्दतीने चौकशी सुरू आहे. त्यातून बरीच माहिती प्रकाशात येत आहे. सचिन माळी आणि शारदा साठे या दोघांना अटक झाली असली तरी अजूनही पुण्यातले पाच तरुण (ज्यात दोन मुली आहेत) नक्षलवादी म्हणून जंगलात कार्यरत आहेत. अशी माहिती आता उघड झाली आहे. त्यांची नावे, आत्ताचे पत्ते आणि ते करत असलेले कार्य यांचे तपशील या अटक झालेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांना मिळाले आहेत आणि मिळालेली माहिती धक्कादायक आहे.

हे पाचही तरुण मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. साधारणतः आदिवासी तरुण नक्षलवाद्यांच्या जाळ्यात सापडतात अशी आजपर्यंत त्यांची प्रतिमा होती. परंतु पुण्यासारख्या शहरातील गैरआदिवासी मुलेसुध्दा नक्षलवादी झालेले आहेत आणि अँजेलाच्या प्रेरणेने गडचिरोली जिल्हयातल्या जंगलामध्ये नक्षलवाद्यांच्यासोबत काम करत आहेत. या सर्वांची नावेसुध्दा निष्पन्न झालेली आहेत.

त्यांच्या पालकांना आपली मुले कबीर कला मंचाच्या माध्यमातून नक्षलवादी झालेली आहेत हे कळले तेव्हा प्रचंड धक्का बसला आणि ते साहजिक होते. आपली मुले कितीही समाजकारण करत असली तरी ती मुले नक्षलवादी सारख्या चळवळीत कधी काळी सहभागी होतील अशी कल्पनासुध्दा पालकांनी केली नसेल. या मुलांनी कबीराचे नाव बदनाम करून टाकले आहे. नाव कबीराचे आणि करणी कसायाची असे त्यांचे अंतःस्वरूप आता उघड झाले आहे. यातले दोघेजण शरण आले आहेत पण म्हणून त्यांना पूर्णपणे माफ करावे असे नाही. त्यांनी काही नक्षलवादी कारवायांमध्ये भाग घेतलाच असणार त्याची त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

मात्र या निमित्ताने शहरातली मुलेसुध्दा नक्षलवादी मार्गांनी जावयास कशी तयार झाली असतील याची उत्सुकताही वाटते आणि चिंताही वाटते. भारतातल्या तरुणांना नक्षलवाद्यांचे विचार आवडायला लागले आणि ही तरुण पिढी आपल्या नादान राज्यकर्त्यांच्या नादापोटी अशा हिंसक चळवळीमध्ये सहभागी व्हायला लागली तर देशामध्ये लोकशाही टिकणे कठीण होऊन जाईल.

Leave a Comment