सीमा शुल्क चुकवल्याबद्दल ललित मोदींना नोटीस

मुंबई, दि.२४ -विमान आयातप्रकरणी तब्बल १८ कोटी रुपयांचे सीमा शुल्क चुकवल्याबद्दल इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) वादग्रस्त माजी आयुक्त ललित मोदी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) या कारवाईमुळे मोदींच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडल्याचे मानले जात आहे.

आयर्लंडमधील एका कंपनीकडून सुमारे १०० कोटी रुपयांच्या एका विमानाची २००८ मध्ये आयात करण्यात आली. या प्रक्रियेत सीमा शुल्क चुकवण्यासाठी मोदींनी बनावट कंपन्यांचा आधार घेतल्याचे डीआरआयच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोदींची आयपीएलच्या आयुक्तपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षेचे कारण पुढे करून त्यांनी लंडनमध्ये आश्रय घेतला आहे.

Leave a Comment