मुशर्रफ यांच्या फार्महाऊसजवळ कारबॉम्ब

इस्लामाबाद, दि.२४ -पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांच्या येथील फार्महाऊसजवळ आज कारबॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली. संबंधित कारमध्ये तब्बल ५० किलो स्फोटके ठेवण्यात आली होती. ती तातडीने निकामी करण्यात आली. इस्लामाबादलगत चक शाहजाद परिसरात मुशर्रफांचे पाच एकरातील फार्महाऊस आहे. अटकेनंतर मुशर्रफ यांना फार्महाऊसमध्येच ठेवण्यात आले आहे. त्यासाठी या फार्महाऊसला सब-जेलचा दर्जा देण्यात आला आहे.

या फार्महाऊसच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर एक कार पार्क करून ठेवण्यात आल्याचे सायंकाळी पोलिसांना आढळले. कारची तपासणी करताना त्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके ठेवण्यात आल्याचे आढळले. ही स्फोटके बॉम्बनाशक पथकांनी तातडीने निकामी केली.

मुशर्रफ यांच्या फार्महाऊसजवळ कारबॉम्ब ठेवणार्‍याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी तातडीने मोहीम हाती घेतली. मात्र, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुमारे चार वर्षांनी पाकिस्तानात परतलेल्या मुशर्रफ यांना जीवे मारण्याची धमकी तालिबान या दहशतवादी संघटनेने याआधीच दिली आहे. मुशर्रफ यांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांचे पथकही स्थापन केल्याचा दावा तालिबानने केला होता.

Leave a Comment