पंतप्रधान, सोनिया समवेत काँग्रेसची तातडीची बैठक

नवी दिल्ली, दि.२४ -कोळसा खाणवाटप घोटाळ्याच्या मुद्द्यावरून भाजपने अतिशय आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. या पार्श्वीभूमीवर, भाजपचा शाब्दिक हल्ला परतवून लावण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारचे नेतृत्व करणार्‍या काँग्रेसची आज तातडीची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित होत्या.

कोळसा खाणवाटप घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आणि प्रामुख्याने भाजपने संसद दणाणून टाकली आहे. एवढेच नव्हे तर, भाजपने पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणीही लावून धरली आहे. या घोटाळ्याच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर लगेचच काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत विरोधकांचा शाब्दिक हल्ला बोथट करण्याच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment