कोलकाता- गेल्या काही दिवसांपासून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोलकात्याच्या सारढा ग्रूपविरुद्ध आंदोलन केले जात आहे. सत्ताधरी तृणमूल काँग्रेसचे काही नेते या चिट फंडच्या अनेक कंपन्यांच्या प्रमुखपदी होते असे बोलले जात आहे. तर २०११ च्या निवडणुकीसाठी या चिट फंडमधील पैसा वापरण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हा घोटाळा आगामी काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संकटात ठरणार आहे.
चिट फंडमधून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवून पळून जाणा-या कोलकात्यातील सारढा ग्रुपच्या प्रमुख व्यवस्थापकीय संचालकासह तिघांना जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. सुदिप्तो सेन, देबजानी मुखर्जी आणि अरविंद सिंग चौहान अशी त्यांची नावे असून, काश्मीरमध्ये पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आल्याचे जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक अब्दुल गनी मिर यांनी सांगितले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घोटाळ्याच्या एसआटी चौकशीचे आदेश दिले असतानाच, मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीतही उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे .
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे काही नेते सारढा ग्रुपशी संबंधित असल्याने हजारो गरीब आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांनी या कंपनीत आपली आयुष्यभराची ठेव गुंतवली होती. गेल्या आठवड्यापासून कंपनीची सर्व कार्यालये बंद करून संचालक फरार झाले होते. त्यामुळे कंपनीकडून फसवणूक झाल्याचे कळताच सर्व गुंतवणूकदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. यामुळे आलेल्या नैराश्यातून गेल्या तीन दिवसांत दोघांनी आत्महत्या केल्या; तर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.